मुंबई : अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांच्या घरात लवकरच लहानग्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर हे जोडपं बाळाच्या स्वागतासाठी तयार आहे. देबिना अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. अशातच ती नेहमी तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांबद्दल खुलेपणाने बोलते.
नुकतंच देबिना ती समोरी गेलेल्या एका मोठ्या अडचणीबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. गर्भधारणेदरम्यान तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागलाय हे देबिनाने एका व्हिडीयोच्या माध्यमातून सांगितलं आहे.
बर्याचदा आपल्याला वाटतं की सेलिब्रेटींचं आयुष्य खूप वेगळं असतं. पण अनेकदा जवळून पाहिल्यावर समजतं की, त्यांना देखील काही सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. स्वतःत्या प्रेग्नेंसीबद्दल शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देबिनाने सांगते की, तिच्यावर किती दबाव होता आणि गर्भधारणेदरम्यान तिला कोणत्या समस्या होत्या.
देबिनावरही आई होण्यासाठी इतर मुलींइतकंच दडपण होतं. देबिनाच्या म्हणण्याप्रमाणे, लोकं तिला खूप काही बोलायचे परंतु लोकांना हे माहित नाही की तुम्हाला कोणत्या समस्येचा सामना करावा लागत आहे. देबिना म्हणते, मला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या ज्यामुळे गर्भधारणा होणं माझ्यासाठी कठीण होतं.
देबिनाने तिच्या व्हिडिओमध्ये एंडोमेट्रिओसिस समस्येबद्दल सांगितलंय. ती म्हणते, या परिस्थितीमुळे तिला मासिक पाळीदरम्यान खूप वेदना झाल्या. त्यामुळे तिला गर्भधारणेदरम्यानही अडचण येत होती.
महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिसची समस्या अधिक सामान्य होताना दिसतेय. यामध्ये गर्भाशयाच्या आतील बाजूस रक्तस्त्राव होतो. यादरम्यान खूप वेदना होतात आणि मासिक पाळी नियमित येण्यातही अडचण निर्माण होते.
या कठीण काळाविषयी माहिती देताना देबिना म्हणाली की, या समस्येवर उपचार करताना तिने अॅलोपॅथीच्या औषधांपासून ते चायनीज अॅक्युपंक्चरपर्यंत सर्व काही केलं.
देबिनाने पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे समाजासाठी मागे हटण्याची किंवा हार मानण्याची गरज नाही. मी त्या सर्व मुलींना सांगू इच्छिते ज्यांना वयाच्या 30 किंवा 40 व्या वर्षी समाजाचा दबाव जाणवतो. समाजाचा जास्त विचार करू नका आणि तुमच्या आयुष्यात काय घडतंय याकडे लक्ष द्या.