मुंबई : ऑक्टोबरमध्ये Worlds Menopause awareness month म्हणून साजरा करण्यासाठी येतो. प्रत्येक महिलेला तिच्या आयुष्यात मेनोपॉज म्हणजेच रोजनिवृत्तीला सामोरं जावं लागतं. दरम्यान याच संदर्भात नुकतंच एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. या सर्व्हेक्षणानुसार, 87 टक्के व्यक्तींना वाटते की, रजोनिवृत्तीचा महिलेच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होतो. तरीही, या विषयाबाबत फारशी चर्चा केली जात नाही.
महिलेच्या आयुष्यात रजोनिवृत्ती हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम सर्व महिलांवर त्यांच्या वयानुसार होतो. जीवनातील या वेगळ्या टप्प्याबाबत महिलांमध्ये जागरुकता वाढवणं आणि त्यांना पाठिंबा देणे हे गरजेचं आहे. जागतिक आरोग्यसेवा अग्रणी कंपनी अॅबॉटने इप्सॉससोबत हे सर्व्हेक्षण केलं आहे.
रजोनिवृत्तीमुळे (जेव्हा मासिक पाळी कायमची थांबते) हार्मोन्समध्ये होणारे बदल सामान्यत: महिलांच्या वयाच्या चाळीशीमध्ये सुरूवात होतात. सरासरी भारतीय महिला पाश्चिमात्य देशांमधील महिलांच्या तुलनेत जवळपास 5 वर्षे लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव घेतात. पाश्चिमात्य देशांमधील महिला जवळपास वयाच्या 46व्या वर्षी रजोनिवृत्ती अनुभवतात. यामुळे अनेक शारीरिक, मानसिक आणि लैंगिक लक्षणं उद्भवू शकतात, ज्याचा जीवनाचा दर्जावर परिणाम होऊ शकतो.