चिमुकलीचं 'निरागस हसू' परत देण्यासाठी क्राऊन प्रिन्स तिच्या घरी गेले

छोट्याशा, गोंडस, निरागस मुलीचं बालमन नकळत आपल्याकडून दुखावलं गेलं,

जयवंत पाटील | Updated: Dec 8, 2019, 12:56 PM IST
चिमुकलीचं 'निरागस हसू' परत देण्यासाठी क्राऊन प्रिन्स तिच्या घरी गेले

दुबई : छोट्याशा, गोंडस, निरागस मुलीचं बालमन नकळत आपल्याकडून दुखावलं गेलं, तर त्यांची सल मोठ्या पदावर बसलेल्यांनाही असते. फुलासारख्या लहान मुलांचा चेहरा, काही कारणामुळे कोमेजला, तर फार वाईट वाटतं. असंच काहीसं झालं, अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या लष्कराचे उप-सहाय्यक कमांडर शेख मोहंमद बिन जाएद अल नाह्यान यांच्यासोबत. अखेर या दोन्ही जणांना त्या मुलीच्या घरी जावं लागलं... का त्याचं कारणंही तेवढंच छानसं आहे.

चिमुकलीच्या नाराजीची छोटीशी कहाणी

सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन-सलमान संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमादरम्यान हे नेते लहान मुलींना भेटत होते.

लहान मुलींच्या दोन रांगा होत्या, त्यांच्या हातात दोन्ही देशांचे झेंडे होते. यातील एका रांगेतील मुलींशी सौदीचे क्राऊन प्रिन्स हात मिळवत होते, तर दुसऱ्या रांगेतील मुलींशी अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स जाएद अल नाह्यान.

आणि अचानक असं झालं...

या दरम्यान एक मुलगी जी सौदी क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांच्याकडील रांगेत उभी होती, ती तिथून पळतच ज्या रांगेतील मुलींशी अल नाह्यान हात मिळवत होते त्या रांगेत जावून उभी राहिली.

हात मिळवण्यासाठी तिने रांग बदलली पण ...

पण झालं असं की, अल नाह्यान या मुलीजवळ आले, तिच्या बाजूच्या मुलीशी हात मिळवला, यानंतर या मुलीनेही अल नाह्यान यांच्याशी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला, पण अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स यांचं तिच्या हाताकडे लक्षच गेलं नाही, आणि ते पुढे निघून गेले आणि एका छोट्याशा गोंडस मुलीचा चेहरा कोमेजल्यासारखा झाला.

तिचं चेहऱ्यावरचं 'निरागस हसू' पुन्हा तिला परत

ही निरागस मुलगी निराश झाली हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अखेर अल नाह्यान यांना राहावलं नाही, ते अखेर या मुलीला भेटण्यासाठी घरी गेले आणि तिचं चेहऱ्यावरचं 'निरागस हसू' पुन्हा तिला परत दिल्यासारखंच झालं.

अल नाह्यान यांनी तिच्या परिवाराशीही बातचित केली, आता हे फोटो अल नाह्यान यांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरही पोस्ट आहेत.