अल-अवजा : इराकचा माजी हुकुमशाह सद्दाम हुसेनचं त्याचं गाव अल-अवजामध्ये दफन करण्यात आलं होतं. पण आता या ठिकाणी त्याचे कोणतेही अवशेष नसल्यामुळे खळबळ उडाली आहे. सद्दामची कबर जिकडे होती तिकडे आता तुटलेलं कॉक्रिंट आणि काट्यांच्या तारासोडून दुसरं काहीही नाही. जवळपास दोन दशकांपेक्षा अधिक काळ इराकवर सत्ता चालवणाऱ्या सद्दाम हुसेनचं ३० डिसेंबर २००६ रोजी दफन करण्यात आलं होतं. यानंतर अत्याचार झालेल्या बहुसंख्य शिया समुदायानं जल्लोष केला होता. तर सद्दामवर प्रेम असणाऱ्या सुन्नी समाजाला हा अपमान वाटला होता.
अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिलेल्या आदेशानंतर सद्दाम हुसेनचा मृतदेह अमेरिकेची हेलिकॉप्टर वापरून बगदादवरून अल-अवजाला नेण्यात आला. तिकडेच सद्दामचा मृतदेह गाडण्यात आला. पण सद्दामच्या कबरीची अशी हालत कोणी केली? सद्दामचा मृतदेह अजून अल-अवजामध्ये आहे का कबरीतून काढून मृतदेहाला दुसरीकडे नेण्यात आलं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सद्दामला दफन केल्यानंतर या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचं रूप आलं होतं. सद्दामचा वाढदिवशी २८ एप्रिलला सद्दाम समर्थक आणि शाळेचे विद्यार्थी याठिकाणी जमतात.
सद्दामची कबर आणि आसपासच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी शिया अर्धसैनिक बलाकडे असते. कबरीच्या भागामध्ये इस्लामिक स्टेटनं त्यांचे स्नायपर तैनात केले होते. यानंतर इराकनं याठिकाणी हवाई हमला केला असल्याचा दावा केला जात आहे. पण सुरक्षा प्रमुखांनी मात्र सद्दामचा मृतदेह तिकडेच असल्याचं सांगितलं आहे. सद्दामची मुलगी हाला जी निर्वासित आहे, तिनं एका खासगी विमानानं सद्दामचा मृतदेह जॉर्डनला नेल्याचे दाखलेही देण्यात येत आहेत. सद्दामचा मृतदेह एका गुप्त ठिकाणी नेला असल्याचा दावा विश्वविद्यालयाचे प्रोफेसर आणि सद्दामच्या एकेकाळच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
सद्दामसारखीच त्याच्या वडिलांच्या कबरीचंही अशाच प्रकारे नुकसान करण्यात आलं होतं. सद्दाम हा मेलेला नाही, ज्याला फाशी दिली तो सद्दामसारखा दिसणारा होता, असंही इराकमध्ये बोललं जातं.