Adult Movie Star Visit Issue: अमेरिका आणि इराणध्ये आता एका महिला पॉर्न स्टारमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. एका अमेरिकी पॉर्न स्टारमुळे हा वाद निर्माण झाला असून तिच्यावर इराणच्या विचारसणीचा प्रसार करत असल्याचा आरोप केला जात आहे. इराणमधून परतलेल्या या पॉर्न स्टारने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन इराण दौऱ्यातील काही फोटो पोस्ट केले होते. यातील एका फोटोमध्ये अमेरिकन दुतावास बंद करावा असा संदेश लिहिलेला होता. या पॉर्न स्टारच्या भेटीने वाद निर्माण झाल्यानंतर इराणमधील अधिकाऱ्यांनी तिच्या दौऱ्याचं आयोजन करण्यामागे आमचा कोणताही सहभाग नाही असं म्हटलं आहे. या पॉर्न स्टारचं नाव व्हिटनी राईट असं आहे. व्हिटनीला इतर कोणत्याही सामान्य नागरिकाप्रमाणे आम्ही व्हिसा दिला. तिच्या या असल्या वादग्रस्त प्रोफेशनबद्दल आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती असं म्हटलं आहे.
व्हिटनी राईट ही इराणचा कट्टर-शत्रू असलेल्या इस्रायलवर तीव्र टीका केल्याबद्दल प्रसिद्ध झालेली. तिच्याच नव्या पोस्ट्मुळे इराणीमधून दुसऱ्या देशात निर्वासित झालेले मूळचे इराणी लोक संतापले आहेत. 2022 साली इराणने हिजाब अनिवार्य केल्याने विरोध प्रदर्शने सुरु होती. देशव्यापी निषेधाच्या पार्श्वभूमीवर व्हिटनी राईटने मात्र महिलांसाठी कठोर मानल्या जाणाऱ्या इस्लामिक ड्रेस कोडचे काळजीपूर्वकपणे पालन केलं होतं. महिलांसाठीच्या ड्रेसच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हा संघर्ष पेटला होता. महसा अमिनीचा सप्टेंबर 2022 मध्ये पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण इराणमध्ये याविरोधात आंदोलन करण्यात आलं.
"अमेरिकन पोर्न स्टार व्हिटनी राईट इराणमध्ये म्हणजेच माझ्या मातृभूमीमध्ये आहे. हा तोच देश आहे जिथे महिलांना त्यांचे केस दाखविण्याने आणि स्वतःच्या भूमीकेशी प्रामाणिक राहिल्यामुळे ठार मारण्यात आलं होतं," अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या इराणी असलेल्या मसिह अलीनेजाद यांनी सोशल मीडियावरुन म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी व्हिटनीनेही इराणमध्ये असताना स्वत: पूर्णपणे डोक्यापासून नखापर्यंत स्वत:ला झाकून घेतलेलं आहे. "इराणी महिलांना भेदभाव मानणारा हा कायदा पाळायचा नाही," असंही मसिह अलीनेजाद यांनी ठापणे सांगितलं आहे.
1979-1981 मध्ये इस्लामिक कट्टरतावाद्यांनी कर्मचाऱ्यांना ओलिस घेतल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधील राजनैतिक संबंध तोडण्यात आले. त्यानंतर इराणधील अमेरिकी दुतावास बंद करण्यात आला. व्हिटनी राईटने याच ठिकाणी एक फोटो काढला. या फोटोमध्ये अमेरिकेचा फाटलेला राष्ट्रध्वज जमिनीजवळ दिसत असून ध्वजस्तंभाच्या अगदी तळापर्यंत उतरवण्यात आलेला दिसत आहे. याच ध्वजस्तंभाच्या बाजूला व्हिटनी राईट उभी आहे. व्हिटनी राईट या फोटोमध्ये इराणमधील नियमांप्रमाणे हेडस्कार्फ, ट्राउजर सूट आणि लांब कोट परिधान केला आहे. इन्स्टाग्रामवर पॉर्न स्टार म्हणून व्हिटनी ज्या प्रकारचे फोटो तिच्या 10 लाख फॉलोअर्ससाठी टाकते त्यापेक्षा हा फोटो फारच वेगळा होता.
"इस्लामिक प्रजासत्ताकचा प्रचार करण्यासाठी तेहरानमध्ये अमेरिकी पॉर्नस्टार व्हिटनी राईटला आमंत्रित करण्यात आले होते. तिला कुठेही कोणीही थांबवलं नाही," असं इराणी महिलांसाठी काम करणाऱ्या फ्रान्समधील 'डेम आझादी' या संघटनेने एक्सवर (ट्विटरवर) लिहिलं होतं. तेहरानमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी व्हिटनी राईटच्या या दौऱ्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. मात्र या भेटीच्या पार्श्वभूमीवर कनानी यांनी आवर्जून, 'राजकीय तणाव असूनही अमेरिकन लोकांना इराणला भेट देण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही,' असं नमूद केलं. व्हिटनीच्या फोटोंमुळे आपला मूळ देश सोडून इतर देशांत स्थायिक झालेल्या आणि तिथलं नागरिकत्व स्वीकारलेल्या लोकांनी टीका करण्यास सुरुवात केल्याने दोन देशांमध्ये या फोटोंमुळे वादाचं चित्र निर्माण झालं आहे.
सूत्रांनी तस्नीम वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "व्हिटनी राईटला इराणमधील कोणत्याही संस्थेनं आमंत्रित केलेलं नव्हतं. येथील व्हिसा जारी करणाऱ्यांना व्हिटनी राईटच्या बेकायदेशीर आणि अश्लील व्यवसायाबद्दलची माहिती नव्हती."
व्हिटनी राईटने या फोटोंमुळे तिच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. "आता जे फोटो काढलेत ते तसेच आङेत. माझ्या इराणमधील सहलीचे फोटो पोस्ट करणे म्हणजे मी इराणचा प्रचार करत आहे असा अर्थ होतो का? मी तिथं जे काही पाहिलं ते केवळ शेअर करत आहे," असं व्हिटनी राईट म्हणाली.
इराणच्या अहवालानुसार व्हिटनी राईटने फोटो शेअर करण्याआधीच इराण सोडलं होतं. पण व्हिटनी राईट किती काळ इराणध्ये राहिली हे स्पष्ट झाले नाही. व्हिटनी राईट इजिप्त, लेबनॉन आणि मोरोक्कोमधील फोटो पोस्ट करत आहे. त्यावरुन ती या प्रदेशात फिरत असल्याचे संकेत मिळत आहेत.