गोमांस खाणे सोडल्याने जागतिक मृत्यूदर कमी होईल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मत

सध्या जगात जेवढे मृत्यू होताहेत. त्याला गोमांस सेवन हे सुद्धा एक कारण आहे.

Updated: Jan 4, 2019, 12:20 PM IST
गोमांस खाणे सोडल्याने जागतिक मृत्यूदर कमी होईल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मत title=

नवी दिल्ली - गोमांस खाण्यावरून भारतात सध्या सरळ सरळ दोन गट पडले आहेत. काही जणांना वाटते यामध्ये काही गैर नाही, तर काही जण हा मुद्दा धर्माशी जोडून गोमांस खाणाऱ्यांवर हल्लेही करतात. पण जागतिक आर्थिक परिषदेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) घेतलेल्या भूमिकेमुळे गोमांस खाण्याचा पुरस्कार करणारे बॅकफूटवर जाऊ शकतात. गोमांस न खाल्ल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील. त्याचबरोबर ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जनही कमी होईल. त्यामुळे शक्यतो लोकांनी गोमांस खाणे टाळावे, असे जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले आहे. एका अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारावर परिषदेने हा दावा केला असल्याचे म्हटले आहे. जागतिक आर्थिक परिषदेसाठी ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलने हा अभ्यास केला होता. विविध फळभाज्यांतील बिया, मटार आणि मायक्रोप्रोटिन यांच्यात अधिक प्रमाणात निरोगी आरोग्यासाठी आवश्यक घटक असतात. 

गोमांस खाणे सोडल्याने लोकांचे आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणही शक्य होईल. सध्या जगात जेवढे मृत्यू होताहेत. त्याला गोमांस सेवन हे सुद्धा एक कारण आहे. जर गोमांस खाणे बंद केले गेले. तर जागतिक स्तरावर २.४ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण कमी होईल. श्रीमंत देशांमध्ये गोमांस खाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तिथे जर का याचे सेवन कमी केले गेले, तर त्या देशांमध्ये ५ टक्क्यांपर्यंत मृत्यूचे प्रमाण कमी होईल. गोमांस खाण्यापेक्षा इतर ज्या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे, त्यांचे सेवन करणे सर्वांच्याच फायद्याचे आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असे जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले आहे. 

या अभ्यासामध्ये गोमांस खाल्ल्याने किती जणांचा मृत्यू झाला, अशी कोणतीही आकडेवारी दिलेली नाही. त्याचबरोबर गोमांस खाल्ल्याने कोणता आजार होतो, याबद्दलही काही माहिती देण्यात आलेली नाही. पण श्रीमंत देशांमध्येच गोमांस मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असल्याने त्याने ते सोडावे, अशी मागणी केली जात आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 
२०५० साली जगाची लोकसंख्या १० अब्जापेक्षा जास्त होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर गोमांस खाण्याचे प्रमाणही आणखी वाढेल. त्यावेळी ग्राहकांची गोमांसची मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही, असे जागतिक आर्थिक परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक डॉमिनिक वाघ्रे यांनी सांगितले.