Canadas gold heist Inside story : 'मनी हाईस्ट' या कलाकृतीनं प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळवलं. याच कथानकाला मागे टाकेल अशा एका घटनेनं सध्या जगभरातील तपास यंत्रणांना हादरा दिला आहे. कारण, ही आहे जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी. ज्युरिक येथून निघालेल्या या विमानाची अधिक चर्चा सुरु आहे, कारण त्यात प्रवासी नव्हते, तर होतं 400 किलो सोनं. विमान लँड झाल्यानंतर तिथंच गोदामात पुढील सूत्र हलली आणि इथूनच वर्षभरानंतर जगासमोर आलं सर्वात मोठ्या चोरीचं वृत्त.
17 एप्रिल 2023 रोजी स्वित्झर्लंडची राजधानी असणाऱ्या ज्युकिक येथून एक कार्गो विमान कॅनडाच्या टोरंटोला पोहोचलं. या विमानात स्वित्झर्लंडमधील एका रिफायनिंग कंपनीच्या 6600 सोन्याच्या विटा आणि 1.9 मिलियन डॉलर इतकी कॅनडाच्या चलनातील रक्कम होती. ही रक्कम वँकुवर येथील बुलियन अँड करन्सी एक्सचेंजमध्ये पोहोचवणं अपेक्षित होतं. जवळपास 400 किलो सोनं आणि एकूण रक्कम असा साधारण 132 कोटी रुपयांचा ऐवज वाहून आणणाऱ्या विमानाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणं अपेक्षित होतं.
त्यात दिवशी पांढऱ्या रंगाचा एक ट्रक कॅनडाच्या विमानतळातील त्यात गोदामात आला जिथं या विमानातील मौल्यवान ऐवज उतरवण्यात आला होता. या ट्रक चालकाकडे एअरवे बिलही होतं, ज्यामध्ये ज्युरिकहून आलेल्या शिपमेंटची माहिती देण्यात आली होती. चालकानं गोदामात असणाऱ्या लोकांना ते बिल दिलं आणि या शिपमेंटमध्ये जगातील सर्वोत्तम प्रतीची मासळी असल्याचं सांगत हेच सामान पोहोचवण्यासाठी आपण इथं आल्याचं सांगितलं. ज्यानंतर ज्युरिकहून आलेलं ते सर्व सामान या चालकाच्या ताब्यात देण्यात आलं. थोडक्यात सोनं आणि ती रोकड मासळीच्या फसव्या बहाण्यानं त्या ट्रकमध्ये भरण्यात आलं आणि पुढच्याच क्षणी तो ट्रक अनेक टोलनाके ओलांडत कुठच्या कुठं पोहोचला.
...रात्री 9.30 वाजता काय घडलं?
17 एप्रिल 2023रोजी, रात्री 9.30 वाजता या घटनेला थरारक वळण तेव्हा मिळालं जेव्हा ज्युरिकहून आलेलं ते सामान (सोनं आणि रोकड) नेण्यासाठी ब्रिंक सिक्योरिटी नावाच्या एका कंपनीचा पेटी आणि टाळेबंद ट्रकवजा कंटेनर कॅनडातील त्याच गोदामात पोहोचला, कारण ऐवजाची एकूण किंमत पाहता तो सुरक्षितरित्या अपेक्षित स्थळी पोहोचवणं हे जबबादारीचं काम होतं. पण, कॅनडातील त्या गोदामात काम करणाऱ्यांना ही शिपमेंट कुठंच सापडली नाही आणि तिथंच 132 कोटींच्या ऐवजाची चोरी झाल्याचं लक्षात येताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.
18 एप्रिल रोजी तातडीनं या चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि तपास सुरु झाला. सुरुवातीला पोलिसांनी त्या पांढऱ्या ट्रकचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि या मोहिमेला 'ऑपरेशन 24 कॅरेट' असं नावही देण्यात आलं. पोलिसांनी गोदाम, विमानतळ आणि रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही तपासले. तो ट्रक मुख्य रस्त्यांवरून कोणत्या उपरस्त्यावर तर गेला नाही, याचीच भीती पोलिसांना होती आणि शेवटी तेच झालं. जवळपास 20 मैल तो ट्रक कुठवर गेला याची माहिती मिळवल्यानंतर लगेचच तो नजरेआड झाला.
पोलिसांना तपासातून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारतीय वंशाच्या एअर कॅनडामधील एका माजी मॅनेजरचाही समावेश असल्याची खळबळजनक बाब समोर आली. हा तोच मॅनेजर होता ज्यानं चोरीनंतर अधिकाऱ्यांना गोदामात नेलं होतं. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात झालेल्या या चोरीनंतर तो 31 वर्षीय सिमरनप्रीत पनेसर नामक मॅनेजर नोकरीचा राजीनामा देऊन दुबईहून भारतात परतला. हळुहळू पोलिसांना या चोरीत सहभागी असणाऱ्या इतरांचीही माहिती मिळाली.
2 डिसेंबर 2023 ला पेन्सेल्वेनियामध्ये पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणाला वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली. या इसमाच्या वाहनाची तपासणी केली असता त्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हा 25 वर्षीय तरुण अमेरिका आणि कॅनडामध्ये हत्यारांच्या तस्करीत सहभागी होता. धक्कादायक बाब म्हणजे हा तोच इसम होता ज्यानं कॅनडातील त्या गोदामातून सोन्याची चोरी करणारा तो ट्रक चालवत हद्दपार नेला होता. गुन्हेगारी तपशीलातून त्याची माहिती समोर आली.
थोडं मागे गेलं असता, जेव्हा हा चालक चोरी करण्यासाठी फसवं बिल देत त्या गोदामात प्रवेश करत होता तेव्हा त्यानं अनावधानानं हातमोजा काढला होता. त्यामुळं तिथं त्याच्या हातांचे ठसे राहिले, ज्यानंतर अमेरिकेतील पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा हे ठसे पाहिले तेव्हा ते एकसारखेच असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात सहाजणांना ताब्यात घेतलं असून त्यापैकी पाचजण कॅनडाचेच नागरिक होते.
चोरांनी टोरी केलेल्या 6600 सोन्याच्या विटांपैकी अनेक विटा वितळवून त्या स्वरुपात विकल्या. विटांवर असणारे अनुक्रमांक त्यांच्या विक्रीत अडथळा निर्माण करत होते, ज्यामुळं त्यांनी त्या वितळवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत पोलिसांना त्या सोन्यातून तयार करण्यात आलेले अवघे 6 ब्रेसलेट हाती लागले. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं असूनही चोरीला गेलेला बराच ऐवज अद्याप हाती लागलेला नाही. त्यामुळं या चोरीचं स्वरुप आणि चोरांनी आखलेला प्लॅन, त्यानंतरचा एकंदर तपास पाहता ही जगातील सर्वात मोठी चोरी ठरवली जात आहे.