जगावर पुन्हा युद्धाचं संकट, आता या 2 देशांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता

आता या 2 देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated: Aug 7, 2022, 03:49 PM IST
जगावर पुन्हा युद्धाचं संकट, आता या 2 देशांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता title=

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष झाल्याने याचा थेट परिणाम जगावर पाहायला मिळाल. जीवितहानी सोबतच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण तरी देखील हा संघर्ष अजून सुरु आहे. या 2 देशातील संघर्ष कायम असताना आता आणखी 2 देशांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

चीनने आपल्या लष्करी कवायतीदरम्यान तैवानला चारही बाजूंनी घेरले आहे. क्षेपणास्त्रे, युद्धनौका, लढाऊ विमानांनंतर आता त्याने युद्धपातळीवर ड्रोनही उतरवले आहेत. हे ड्रोन जपानच्या जवळून उड्डाण करत तैवानच्या दिशेने आले आहेत. त्यामुळे तैवानच्या आखातात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनचे नौदल आणि हवाई दल आखाती देशात सातत्याने युद्ध सराव करत आहेत. त्यांची युद्धनौका आणि लढाऊ विमाने आखातातील मधली रेषा ओलांडून तैवानला सतत चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनने गेल्या काही दिवसांपासून तैवानवर कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहेत. तैवानच्या वायव्य आणि नैऋत्य भागाच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

तैवान चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी ट्विट केले आहे की, आम्ही चीनच्या कारवाया आणि कवायतीच्या नावाखाली होणाऱ्या हल्ल्यांवर सतत लक्ष ठेवून आहोत. आम्हाला धोक्याची जाणीव होताच आम्ही अचूक प्रतिसाद देऊ. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला लोकशाही तैवानचे रक्षण करण्याचे आवाहन करतोय.

त्साई इंग-वेन यांनी चीनच्या लष्करी कवायतीला प्रत्युत्तर म्हणून त्यांचे सरकार काय करत आहे हे देखील सांगितले. आम्ही चीनवर सतत लक्ष ठेवून आहोत. कारण तो तैवान आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका आहे. तैवानच्या आखातात चीनच्या युद्धनौका, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांमुळे स्थानिक शांतता भंग पावली आहे. चीनने आपल्या लष्करी कवायती त्वरित थांबवाव्यात अशी आमची इच्छा आहे.

'आमचे सैन्य पूर्णपणे तयार आहे. आम्ही सर्व प्रकारच्या लष्करी घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. आमचे सरकार देखील चीनचे सक्रिय माहिती युद्ध योग्यरित्या समजून घेत आहे. आमच्या सर्व एजन्सी पूर्ण अलर्ट मोडवर आहेत.'