ट्रम्प यांना अटक! स्वत: शेअर केला फोटो; 1.65 कोटी रुपये भरुन 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले पण...

Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि 2024 च्या राष्ट्राअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमधील आघाडीचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्म्प हे अचानक जॉर्जियामधील एका तुरुंगामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 25, 2023, 09:22 AM IST
ट्रम्प यांना अटक! स्वत: शेअर केला फोटो; 1.65 कोटी रुपये भरुन 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले पण... title=
अचानक जॉर्जियातील रुग्णालयात पोहोचले ट्रम्प (फोटो - एआय जनरेटेड सौजन्य - Twitter/EliotHiggins वरुन साभार)

Word News in Marathi: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) शरण आले आहेत. गुरुवारी सायंकाळी ट्रम्प अमेरिकेतील जॉर्जियामधील (Georgia) एका तुरुंगामध्ये पोहोचले. जॉर्जियामध्ये बेकायदेशीररित्या 2020 साली झालेल्या निवडणुकीचे निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. फुल्टन काउंटी तुरुंगामध्ये ट्रम्प यांचा अमेरिकेत कैद्यांचा फोटो काढला जातो तसा मग शॉट घेण्यात आला. तुरुंगातील रेकॉर्डप्रमाणे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम् यांनी बुकिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांना 2 लाख डॉलर्सच्या (भारतीय चलनानुसार 1 कोटी 65 लाख रुपये) बॉण्डवर आणि अन्य अटींवर मुक्त करण्यात आलं. या अटींमध्ये प्रकरणातील प्रतिवादी असलेल्यांना सोशल मीडियावरुन धमकवू नये या अटीचाही समावेश आहे. ट्रम्प हे अवघ्या 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले असले तरी त्यांच्या या अटकेचा परिणाम त्यांच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी दाव्यावर होण्याची दाट शक्यता आहे.

कैदी क्रमांक आणि कैद्यासारखा फोटो काढला

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे जवळपास 20 मिनिटं फुल्टन काउंटी तुरुंगामध्ये होते. ट्रम्प यांनी या तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. "मी काहीही चुकीचं केलेलं नाही," असं ट्रम्प म्हणाले. फुल्टन काउंटीच्या शेरिफ कार्यालायाने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मग शॉट म्हणजेच तुरुंगात काढलेला फोटो जारी केला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार तुरुंगातील रेकॉर्डनुसार ट्रम्प यांना प्रातिनिधिक स्वरुपाची अटक करण्यात आली होती. त्यांचा कैदी क्रमांक P01125809 असा होता. जॉर्जियामध्ये ट्रम्प हे चौथ्यांदा शरण आले. 

स्वत: पोस्ट केला फोटो

ट्रम्प यांनी या अटक आणि सुटकेनंतर स्वत: ट्विटरवरुन आपला तुरुंगात काढण्यात आलेला फोटो पोस्ट केला आहे. 'मग शॉट - ऑगस्ट 24, 2023... निवडणुकीमध्ये हस्तेक्षेप... कधीच शरण येणार नाही' असा मजकूर आणि ट्रम्प यांच्या वेबसाईटचा उल्लेख या फोटोवर आहे.

वादात तरी आघाडीवर

ट्रम्प यांना कायदेशीर सल्ला देणाऱ्या टीममध्ये बदल झाल्यानंतर त्यांनी अचानक आत्मसमर्पण केलं. कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतरही ट्रम्प 2024 मधील निवडणुकीसाठी रिपब्लिकन उमेदवार पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पक्षातील इतर संभाव्य उमेदवारांपेक्षा ट्रम्प हे बरेच आघाडीवर आहेत. ट्रम्प यांच्याभोवती कायद्याचा फास आवळत असतानाही दुसरीकडे त्यांना पाठिंबाही वाढत असल्याचं दिसत आहे. ट्रम्प यांच्या कायदेशीर लढाईचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले नेते करत आहेत. फुल्टन काउंटी येथे मार्च महिन्यानंतर ट्रम्प यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला हा चौथा गुन्हेगारी स्वरुपाचा खटला आहे. अमेरिकेमध्ये दोषी ठरवण्यात आलेले ट्रम्प हे पाहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. 

अन्य एका प्रकरणातही दोषी

याच महिन्यामध्ये अटलांटाचे माजी चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज, न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी गिउलिआनी यांच्यासहीत 18 व्यक्तींबरोबर ट्रम्प यांना रॅकेटिअरिंग कायदा आणि कट रचण्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आलं. गिउलिआनी यांनी बुधवारी आत्मसमर्पण केलं आणि मग शॉट काढून घेतला. मीडोज यांनी वरिष्ठ कोर्टात जाण्याची भूमिका घेत आत्मसमर्पणास नकार दिला. ते गुरुवारी तुरुंगात हजर होतील अशी शक्यता आहे. त्यांची 1 लाख अमेरिकी डॉलर्सच्या बॉण्डवर सुटका केली जाऊ शकते असंही सांगितलं जात आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपांची संख्या वाढल्याने ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.