Russia Vs Ukraine War | ना आई... ना बाबा.. रडणाऱ्या मुलाकडे पाहून जग सुन्न झालं

हातात एक चॉकलेट, अंगावर छोटीशी बॅग, त्यात पासपोर्ट, आईनं लिहिलेली एक चिठ्ठी आणि डोळ्यांत पाणी घेऊन तो दिवस रात्र फक्त चालत होता

Updated: Mar 9, 2022, 02:44 PM IST
Russia Vs Ukraine War | ना आई... ना बाबा.. रडणाऱ्या मुलाकडे पाहून जग सुन्न झालं title=

बई : युद्ध केवळ देश बेचिराख करत नाही तर एक अख्खी पिढी उद्ध्वस्त करतो. ज्या वयात खेळायचं, बागडायचं. त्या वयात माथ्यावर युद्धाचे ढग जमले तर काय होऊ शकतं याचं एक जिवंत उदाहरण युक्रेनमध्ये पाहायला मिळलं. जीव वाचवण्यासाठी एका चिमुकल्यानं हजारो किलोमीटरचा प्रवास केलाय. जगण्याची त्याची जिद्द यशस्वी झाली असली तरी त्याच्या चिमुकल्या डोळ्यांमध्ये दाटलेला आसवांचा समुद्र बरचं काही सांगून जातोय. 

कुणाचंही काळीज पिवळचून जाईल असं या चिमुरड्याचं रडणं. युद्धाचे भयानक परिणाम काय असतात, याचं हे अंगावर काटा आणणारं चित्र. हा चिमुरडा हजारो किलोमीटचा प्रवास पायी करत युक्रेनमधून स्लोव्हाकियामध्ये पोहोचलाय. एकटाच त्याचे आई वडील, नातेवाईक कुणीही बरोबर नाहीत.

हातात एक चॉकलेट, अंगावर छोटीशी बॅग, त्यात पासपोर्ट, आईनं लिहिलेली एक चिठ्ठी आणि डोळ्यांत पाणी घेऊन तो दिवस रात्र फक्त चालत होता. अकरा वर्षांचा हा मुलगा युक्रेनमधल्या जपोरिझियामध्ये राहात होता. या शहरावर रशियानं कब्जा केला.

युद्ध भयानक असतं.... ते माणसं, संसार, शहरं, देश सगळंच उध्वस्त करतं... त्याहीपेक्षा भयानक असतं युद्धामध्ये हे असं बालपण होरपळून जाणं.... युद्धाच्या खुणा कालांतरानं मिटतीलही... पण चिमुकल्या मनांवरचे युद्धाचे हे ओरखडे आयुष्यभर टोचत राहतील.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. हा व्हिडीओ खरंच तसा आहे का? किंवा मुलगा एवढं किलोमीटर खरंच चालून आलं असेल का?  त्यामुळे Fack Check अशीही चर्चा रंगली आहे.