मुंबई: सध्या देशभरात पेट्रोलच्या किमतींनी अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. इंधनाच्या किमती पाहून चारचाकी गाड्यांच्या मालकांचे हृदय तर असे धडधडते आहे की गाडीचे इंजिनही फिके पडेल. पण, काही लोकांना याचा काहीच फरक जाणवत नाही. दरम्यान, एका महाभागाने मात्र भलतीच शक्कल लढवली आहे. या पठ्ठ्याने आलीशान कार चक्क रिक्षावर लादली आणि प्रवास केला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भलताच व्हायरल होत आहे.
ही घटना आहे चीनमधील झेजियांग शहरातली. व्हिडिओतील व्यक्ती काळ्या रंगातील आलीशान कार रिक्षावर लादून घेऊन निघाला आहे. पीपल्स डेली चायनाने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास केला असता मजेशीर प्रकार पुढे आला. आगोदर व्हिडिओ पाहा मग खरा किस्सा वाचा.
Reckless driver on road! A man carries a car on his tricycle in southeast China's Zhejiang Province pic.twitter.com/NcVyFLgLl5
— People's Daily,China (@PDChina) June 1, 2018
पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आलेली माहिती अशी की, हा व्यक्ती व्यवसायाने भंगारवाला आहे. त्याने ही कार ८०० यूआन म्हणजेच अवघ्या ५ हजार तिनशे रूपयांत खरेदी केली होती. या कारचे स्पेअर पार्ट्स विकण्यासाठी तो जंकयार्डला घेऊन चालला होता. पण, त्यासाठी इतर पर्याय न वापरता या महाभागाने कार थेट रिक्षावर बांधली आणि घेऊन निघाला. दरम्यान, वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्धल या महाभागाला पोलिसांनी १३०० यूआनचा दंड केला आहे. आता तुम्हीच सांगा कारचा हा व्यवहार त्याला केवढ्याला पडला.