मेहुल चोकसीचं एन्टीगा नागरिकत्व रद्द, लवकरच भारताकडे सोपवणार

एन्टीगाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉन (Gastone Browne) यांच्या म्हणण्यानुसार, चोकसीचं एन्टीगा आणि बरबूडा नागरिकत्व लवकरच रद्द केलं जाईल

Updated: Jun 25, 2019, 04:01 PM IST
मेहुल चोकसीचं एन्टीगा नागरिकत्व रद्द, लवकरच भारताकडे सोपवणार title=

नवी दिल्ली : देश सोडून पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोकसीला लवकरच भारतात आणलं जाईल, ही शक्यता आता सत्यात उतरू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, एन्टीगाचे पंतप्रधान यांनी मेहुल चोकसीचं एन्टीगा नागरिकत्व रद्द करून त्याला लवकरच भारतात परत पाठवण्यात येईल, असं जाहीर केलंय. एका स्थानिक वर्तमानपत्रानं ही बातमी दिलीय. भारतातून फरार झाल्यानंतर पळपुट्या चोकसीनं एन्टीगामध्ये आसरा घेतलाय. 

एन्टीगाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉन (Gastone Browne) यांच्या म्हणण्यानुसार, चोकसीचं एन्टीगा आणि बरबूडा नागरिकत्व लवकरच रद्द केलं जाईल. आपला देश अपराध्यांसाठी सुरक्षित जागा बनू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 

अपराध्यांनाही कायदेशीर हक्क असतो. त्यांच्याकडे अजूनही कोर्टात जाण्याचा अधिकार अबाधित आहे. परंतु, लवकरच कायदेशीर प्रक्रिया उरकून आम्ही त्याला भारतात परत पाठवू, असं ब्रॉन यांनी म्हटलंय. 

गेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टानं १ जुलैपर्यंत मेहुल चोकसीच्या वकिलांना त्याच्या प्रकृतीची स्थिती स्पष्ट करणारे सध्याचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. सोबतच डॉक्टरांची एक टीमही बनवण्यात आलीय. चोकसीला एअर एम्बुलन्समध्ये प्रवास करणं योग्य आहे किंवा नाही, हेदेखील ही टीम लवकरच स्पष्ट करेल. स्पेशालिस्ट टीम ९ जुलैपर्यंत कोर्टात आपला रिपोर्ट सादर करेल. प्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे.  पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) साडे तेरा हजार करोड रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोकसीवर आहे.