Mount Everest Video : समुद्रसपाटीपासून तब्बल 8849 मीटर म्हणजेच जवळपास 29,029 फूट इतक्या (Mount Everest height) उंचीवर असणारा माऊंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वोच्च पर्वत म्हणून ओळखला जातो. एकदातरी हा पर्वत सर करण्याचं स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक पाहत असतो. अनेकांना हे स्वप्न साकारण्याची संधीसुद्धा मिळते. तर काही मंडळी मात्र हे स्वप्न उराशीच बाळगून असतात. अशा या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं निघालेले अनेक गिर्यारोहक सध्या एव्हरेस्ट शिखरावर असून, इथं चक्क गिर्यारोहकांमुळं प्रचंड कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
विविध व्हिडीओ किंवा चित्रपटांच्या माध्यमातून, माहितीपटातून आतापर्यंत एव्हरेस्ट सर्वांनाच अतिशय जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे. ज्यामुळं तिथं पोहोचणं सोपं, असाही अनेकांचाच गैरसमज झाला आहे. पण, प्रत्यक्षात मात्र तसं नाही. कारण, एव्हरेस्ट आजही तितकाच कठीण चढाईचा पर्वत असून, तिथं होणाऱ्या निसर्गाच्या माऱ्यापासून कोणाचाही बचाव निव्वळ अशक्यच.
बर्फानं अच्छादलेला एव्हरेस्ट पाहताना त्याच्या आजुबाजूलाही असंच चित्र असणं अपेक्षित आहे. पण, प्रत्यक्षात मात्र एव्हरेस्टच्या बेसकॅम्पला वेगळी आणि तितकीच चिंतेत टाकणारी परिस्थिती पाहायला मिळत आहे. नुकतेच सोशल मीडियावर काही गिर्यारोहकांनी शेअर केलेले फोटो पाहता एव्हरेस्ट बेस कॅम्पवर कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, ज्यामुळं तेथील नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होताना दिसत आहे.
एव्हरेस्टच्या चढाईदरम्यान येणारी संकटं, हिमस्खलन आणि तत्सम घटनांमुळं इथं ट्रेकदरम्यान होणाऱ्या अपघाती मृत्यूंची संख्याही मोठ्या तुलनेत वाढली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता, इतका अतिरेक का? हाच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. गिर्यारोहण क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या राजन द्विवेदी यांची एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं जगातील हा सर्वोच्च पर्वत सर करण्यासाठी आणि त्याचं शिखर गाठण्यासाठी म्हणून लागलेली गिर्यारोहकांची लांबलचक रांग चिंतेचा विषय ठरत आहे.
'माऊंट एव्हरेस्ट ही काही थट्टा नसून, एक गंभीर चढाई आहे. खुंबू आईसफॉल्स, सी3 ते सी4 आणि 3 या टप्प्यांवर ही चढाई आणखी बिकट होते. संपूर्ण रात्र रक्त गोठवणाऱ्या या मृत्यूच्या सापळ्यात काढणं म्हणजे आव्हान. जवळपास 500 हून अधिक नवखे, अनुभवी आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले गिर्यारोहक हा पर्वत सर करण्यासाठी आले होते. आतापर्यंत, 1 मे 1953 नंतर जवळपास 7000 गिर्यारोहकांनी हा शिखर सर केला. अनेकांना बर्फाचा त्रास झाला, अनेकांना बर्फामुळं अंधत्व आलं, दुखापती झाल्या... याची कुठंही नोंद नाही.
हा व्हिडीओ दाखवून देतोय की, त्या एका दोरावर एका रांगेत आम्ही नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना केला. वर जाण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठीच्या प्रवासादरम्यान एकमेकांशी संवादही साधला...' इथून खाली येणं एका भयावह स्वप्नासारखं आहे सांगताना तिथं ताशी 100 ते 240 किमी इतक्या वेगानं वारेही वाहत होते असंही त्या पोस्टमध्ये म्हटलं.
एव्हरेस्टची चढाई करताना अनेक गर्यारोहकांना प्राण गमवावे लागतात. इथं वेळ प्रसंगी अनेक मृतदेह आहेत त्याच अवस्थेत सोडून काही मंडळी पुढेही निधून गेली आहेत. अशा या एव्हरेस्टवर आता मानवनिर्मित कचऱ्यासह मानवी मृतदेहांचे अवशेषही असल्यामुळं एक वेगळंच संकट डोकं वर काढताना दिसत आहे.