मुंबई : आपल्याला तर हे माहितच आहे की, आपल्या गाडीचं चलान कापलं गेलं असेल, तर आपल्याला ते ऑनलाईन पाहाता येतं. तसेच आपल्याला ते ऑनलाईन भरता देखील येतं. तर असाच एक चलान कापल्याचा मॅसेज एका व्यक्तीला आला. परंतु ते चलान पाहाताच व्यक्तीला खूप मोठा धक्का बसला. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, नक्की असं काय झालं असेल?
खरंतर या व्यक्तीची दुचाकी 8 वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. परंतु त्याच्या नावावर ही गाडी असल्यामुळे त्याला या बाईकचं चलान गेलं. त्यावेळी त्याने पाहिलं की, ही बाईक अन्य कोणी चालवत नसून स्वत: पोलिस वापरत आहे.
वास्तविक, हे प्रकरण पाकिस्तानमधील आहे, जिथे लाहोरच्या मुगलपुरा भागात राहणाऱ्या इम्रान नावाच्या व्यक्तीची होंडा सीडी-70 बाइक 8 वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. त्यानंतर इम्रानने यासंदर्भात जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. मात्र दुचाकीचा काहीही पत्ता लागला नाही.
पण अलीकडेच त्याच्या हरवलेल्या बाईकच्या चालानचा मेसेज मिळाल्यावर इम्रान थक्क झाला. या चालानमध्ये दुचाकीचा फोटो होता, ज्यावर पोलिस बसले होते.
हे पाहून इम्रानचा आधी विश्वास बसला नाही, पण तपास केला असता एक पोलीस कर्मचारी त्याची हरवलेली दुचाकी वापरत असल्याचे आढळून आलं.
Imagine getting fined for a motorcycle that was stolen 8 years ago. A man named Imran from Lahore shared how his motorcycle was stolen years ago and to make matters worse, according to the report police officials were allegedly driving it in Sabzarar. #etribune #news #lahore pic.twitter.com/V0lTPpNR54
— The Express Tribune (@etribune) May 31, 2022
पाकिस्तानी मीडिया आउटलेट द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, इम्रानने बाईकच्या संदर्भात पोलिस स्टेशनच्या अनेक फेऱ्या मारल्या, पण त्याच्या वाहनाचा पत्ता लागला नाही. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला 8 वर्षांनी बाईकची माहिती मिळाली तेव्हा त्याने पोलिस अधिकाऱ्यांकडे (सीसीपीओ) तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्याने आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांला दुचाकी इम्रानला देण्यास सांगितले.
तक्रारदार इम्रानचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या दुचाकी चोरीच्या घटनेबद्दल तपशीलवार सांगत आहे. त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर आपली दुचाकी वापरल्याचा आरोप केला आहे.