डोकं छाटलं तरी तो कोंबडा 18 महिने जिवंत होता; पण त्या एका चुकीमुळं झाला मृत्यू

Mike the Headless Chicken: अमेरिकेत 70 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्यानं एका कोंबड्याची मान कापली, पण तो कोंबडा मेलाच नाही. तब्बल 18 महिने तो कोंबडा जिवंत राहिला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 3, 2023, 04:10 PM IST
डोकं छाटलं तरी तो कोंबडा 18 महिने जिवंत होता; पण त्या एका चुकीमुळं झाला मृत्यू title=
The Farmer Cut Off The Head Of The Chicken How Did It Survive For So Long

Mike the Headless Chicken: एखाद्याचे मुंडके छाटले तर तो जिवंत राहू शकतो का? तुमचेही उत्तर नाही असंच असेल ना. पण 78 वर्षांपूर्वी सर्वांना चकित करणारी घटना घडली होती. अमेरिकेत ही घटना घडली होती. एका शेतकरी कुक्कुटपालन करत होता. एक दिवस शेतकऱ्याने 40 ते 45 कोंबड्या कापल्या. जेव्हा साफ-सफाई करताना कापलेल्या कोंबड्या उचलायला तो गेला तेव्हा एक कोंबडा जिवंत असल्याचे लक्षात आले. त्याने त्याला हात लावताच त्याने धावायला सुरुवात केली. शेतकऱ्याने त्याला उचलून एका टोपलीत बंद करुन ठेवले. डोकं धडापासून वेगळं केल्यानंतरही तो जिवंत कसा राहिला हा प्रश्न अद्याप कायम आहे.

BBCनुसार, 1945मध्ये कोलाराडो येथील फ्रूटा गावात लॉयल ओल्सेन आणि त्याची पत्नी क्लारा कोंबड्या कापत होती. त्यांनी जवळपास 40 ते 45 कोंबड्या कापल्या त्यातील 1 सोडून बाकी सगळ्या मेल्या होत्या. तो एक कोंबडा डोकं छाटलेल्या अवस्थेत फिरताना दिसत होता. हा प्रकार पाहून तेदेखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्याला एका पेटील बंद करुन निघून गेले. दुसऱ्या दिवशी लोयल ऑल्सनने पेटी उघडली तर कोंबडा अजूनही जिवंत होता. 

डोकं नसलेल्या या कोंबड्याची चर्चा हाहा म्हणता सगळीकडे पसरली. त्यानंतर परिसरात या कोंबड्याला हेडलेस चिकन म्हणून नाव देण्यात आलं होतं. तसंच, या कोंबड्याचे नाव माइक असं होतं. मात्र, हेडलेस चिकन या नावाने चिकन रातोरात लोकप्रिय झाला. डोकं छाटलेले असताना देखील हा कोंबडा तब्बल 18 महिने जिवंत राहिला. मात्र, या मागचं कारण कोणालाच कळू शकलं नाही. ऑल्सन, क्लारा आणि माइक मग अमेरिकाच्या दौऱ्यावर गेले होते. अमेरिकेच्या फिनिक्स भागात दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. 

माइक 18 महिने जिवंत कसा राहिला?

माइकला ड्रॉप्सच्या सहाय्याने त्याच्या अन्ननलिकेतून ज्यूस आणि इतर द्रव अन्न पदार्थ देण्यात येत होते. अन्ननलिकेद्वारेच तो श्वास घेत होता. त्यामुळं हा भाग दररोज इंजेक्शनसारख्या पिचकारीने साफ केला जायचा. फिनिक्समधील हॉटेलमध्ये माइक्सचा श्वास कोंडून मृत्यू झाला. जेव्हा माइकचा श्वास कोंडला तेव्हा त्याला नेमकं इंजेक्शन सापडलं नाही. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला. 

कोंबडा जिवंत राहिलाच कसा

वैज्ञानिकांच्या मते कोंबडीचा मेंदू तिच्या डोळ्यांना जोडणाऱ्या हाडांच्या मागच्या बाजूला असतो. माइकच्या बाबतीत त्याचा २० टक्के मेंदू कापला गेला होता तर ८०% मेंदू जो शरीर, हृदय, भूक आणि अन्नपचन नियंत्रित करतो तो भाग सहीसलामत राहिला होता.