कीव : युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती असतानाही भारतीय विद्यार्थ्यांची घरवापसी सुरू आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, खार्किव या युद्धग्रस्त शहरातून जवळपास सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर आता संपूर्ण लक्ष पूर्व युक्रेनमधील सुमीमध्ये अडकलेल्या सुमारे 700 भारतीयांना बाहेर काढण्यावर आहे.
अलीकडच्या काही दिवसांत या प्रदेशात गोळीबार आणि हवाई हल्ल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, युक्रेनमधील भारतीय राजदूतांनी ट्विट करून विद्यार्थ्यांच्या संयम आणि धैर्याचे कौतुक केले आहे. सर्व भारतीयांच्या परतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनमध्ये अजूनही अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही राजदूतांनी केले.
भारतीय राजदूत म्हणाले - भारतीय विद्यार्थ्यांच्या संयमाचा आम्हाला अभिमान आहे
आपल्या निवेदनात युक्रेनमधील भारतीय राजदूत म्हणाले की, गेले दोन आठवडे आपल्या सर्वांसाठी अत्यंत वेदनादायी आणि आव्हानात्मक होते. त्यांच्या आयुष्यात अशी वेदना आणि व्यत्यय क्वचितच कोणी पाहिला असेल. तरीसुद्धा, मला आपल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषतः तरुण भारतीय विद्यार्थ्यांच्या परिपक्वता आणि संयमाचा अभिमान आहे. या कठीण काळातही त्यांनी खूप संयम दाखवला आहे. भारतीय राजदूतांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात आम्ही युक्रेनमधून 10000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. खार्किव आणि सुमी वगळता उर्वरित युक्रेनमधून जवळपास सर्व भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, "खार्किव हे प्रचंड विध्वंस असलेले सक्रिय युद्ध क्षेत्र असूनही, आम्ही आमच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत," गेल्या दोन दिवसांत, आम्ही पेसोचिनमधून सुमारे 500 भारतीयांना बाहेर काढले आहे. आजपर्यंत पेसोचिनमध्ये आणखी 300 भारतीय अडकले होते, ज्यांना बाहेर काढले जात आहे.
आमच्या विद्यार्थ्यांनी खूप त्रास सहन केला, सर्वांना घरी नेणार
सुमीच्या बाबतीतही आमच्या दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. मला माहित आहे की आमच्या विद्यार्थ्यांनी खूप सहन केले आहे आणि या काळात त्यांनी अतुलनीय शक्ती आणि दृढनिश्चय दर्शविला आहे. मी तुम्हाला आणखी काही संयम आणि सहनशीलता बाळगण्याची विनंती करतो जेणेकरून आम्ही तुमची सुरक्षितता सुनिश्चित करू शकू. आम्ही सर्व भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या पश्चिम सीमेवर घेऊन जाण्यासाठी थोडा अधिक तग धरण्याचे आवाहन करतो. भारत सरकार तुम्हा सर्वांना घरी घेऊन जाईल. मी तुम्हाला सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे आणि युक्रेनियन अधिकारी आणि नागरिकांसह सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन करतो. युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे आम्ही खूप कौतुक करतो, असेही ते म्हणाले.