Titanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अतिशय वाईट अंत झाला आणि अखेर या पाणबुडीचे अवशेष पाण्याबाहेर काढण्यात आले.   

सायली पाटील | Updated: Jun 29, 2023, 01:01 PM IST
Titanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा title=
Titan Sub update remains Human remains found wreckage photos went viral

Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक या अवाढव्य जहजाचा अपघात, त्याला मिळालेली जलसमाधी आणि असंख्य निष्पापांचा बळी या सर्व गोष्टी शतकभराचा काळ लोटला तरीही अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. याच कुतूहलापोटी काही व्यक्तींनी थेट समुद्राच्या तळाशी जाऊन या जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Titan ही ओशनगेट कंपनीची पाणबुडी त्यापैकीच एक. 

18 जून रोजी टायटन पाणबुडी टायटॅनिक पाहण्यासाठीच्या प्रवासाला निघाली. पण, तो प्रवास शेवटचा ठरला. पाच अब्जाधीशांना घेऊन निघालेल्या या पाणबुडीता संपर्क प्रवासाच्या काही तासांनंतर तुटला आणि तातडीनं कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन या राष्ट्रांनी पाणबुडीचा शोध घेण्यासाठीच्या मोहिमा हाती घेतल्या. पण, अखेर 22 जून रोजी पाणबुडीचं Implosion झाल्याचं अधिकृत वृत्त प्रसिद्ध करत त्यातील पाचही प्रवाशांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या पाणबुडीचे अवशेष टायटॅनिकच्या अवशेषांपासून काही अंतरावर आढळल्यामुळं संपूर्ण जगानं याबाबतच हळहळ व्यक्त केली. बुधवारीच या पाणबुडीचे अवशेष अमेरिकेच्या तटरक्षक दलानं समुद्राबाहेर काढले. ज्यामध्ये प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशांच्या मृत शरीराचेही अवशेष असल्याची माहिती समोर आली. 

हेसुद्धा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच; नागरिकांच्या हिताची जबाबदारी शासनाची

अमेरिकेच्या तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला दोन प्रवाशांचे अवशेष त्यांच्याकडून देशात आणले जात आहेत. बुधवारी टायटन पाणबुडीचे अवशेष हाती लागल्यानंतर अमेरिकन यंत्रणांकडून त्याला दुजोरा देण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार या अवशेषआंसोबतच काही मानवी अवशेषही सापडले आहेत, ज्यांची पुढील चाचणी प्रक्रिया पार पडणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 

तटरक्षक दलाचे प्रमुख कॅप्टन जेसन न्यूबॉयर यांच्या माहितीनुसार या पुराव्यांमुळं येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती मिळवण्यााठी यंत्रणांना मोठी मदत मिळणार आहे. येत्या काळात समुद्री अपघात आणि त्यामागची कारणंही या पुराव्यांमुळं समजू शकणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान सध्याच्या घडीला पाणबुडीच्या अवशेषांसोबत हस्तगत करण्यात आलेले मानवी शरीराचे अवशेष अतिशय वाईट अवस्थेत असून, त्यामुळं अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. 

कुठे आणि कसे मिळाले हे अवशेष? 

टायटन पाणबुडीच्या अपघातानंतर लगेचच ऐकू आलेल्या एका भयंकर आवाजाच्या धर्तीवर शोधपथकांनी त्यांच्या शोधमोहिमांचा मार्ग निर्धारित करत तातडीनं सूत्र चाळवली. ज्यानंतर काही तासांतच पाणबुडीचे अवशेष हाती लागल्याची माहिती समोर आली. ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी साधारण 12500 फूट म्हणजेच 3810 मीटर इतक्या अंतरावर उध्वस्त झाली. Titanic  'टायटॅनिक'पासून ही पाणबुडी साधारण 1,600 फूट (488 मीटर) असल्याचं सांगण्यात आलं.