संयुक्त राष्ट्राकडून भारताचं कौतुक आणि आभार

भारताने दाखवलेल्या तत्परतेचे यूएनकडून कौतुक

Updated: Jan 11, 2020, 06:56 PM IST
संयुक्त राष्ट्राकडून भारताचं कौतुक आणि आभार  title=

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी भारताचे आभार मानले आहेत. भारताने संयुक्त राष्ट्रांना यावर्षीचा निधी वेळेआधी पाठवल्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी भारताचे कौतुक केलं आहे. भारताने शुक्रवारी यंदाचा २३.४ मिलीयन डॉलरचा निधी वेळेआधी संयुक्त राष्ट्रांकडे सोपवला आहे. निधी वेळेआधी देणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर १९३ राष्ट्रांपैकी ४७ देशांनी अद्याप आपला उर्वरीत निधीही दिलेला नाही. सध्या संयुक्त राष्ट्राला आर्थिक चणचण भासतेय, त्यात भारताने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करण्यात आलं आहे.

भारताने वेळेच्या आधी निधी पाठवल्यामुळे महासचिवांचे प्रवक्ते स्टेफन डुजारिक यांनी शुक्रवारी भारताचे आभार मानले. भारताला या महिन्याच्या शेवटपर्यंत हा निधी जमा करायचा होता. डुजारिक यांनी म्हटलं की, 'खूप कमी देश आहेत ज्यांनी जानेवारी महिना संपण्याच्या आधीच हा निधी दिला आहे. काही देशांचा तर मागच्या वर्षीचा ही निधी बाकी आहे.'

संयुक्त राष्ट्रात एकूण १९३ देश सदस्य आहेत. ज्यापैकी ४७ देशांनी मागच्या वर्षीचा निधी अजून भरलेला नाही. गुटेरस यांनी म्हटलं की, गेल्या एक दशकापासून यूएनपुढे आर्थिक संकट उभं आहे.' यूएनच्या अनेक सेवा यामुळे कठीण परिस्थितीत सुरु आहेत.