अमेरिकेत बेवारसरित्या आढळलं नवजात बालक, नाव मिळालं 'बेबी इंडिया'

पहिल्यांदा पोलिसांनी या चिमुरडीचे नातेवाईक सापडतायत का हे चाचपडून पाहिलं, पण... 

Updated: Jun 27, 2019, 02:44 PM IST
अमेरिकेत बेवारसरित्या आढळलं नवजात बालक, नाव मिळालं 'बेबी इंडिया' title=

वॉशिंग्टन : अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात पोलिसांना प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं एक नवजात बालक सापडलंय. पोलिसांनी या चिमुरडीचं 'बेबी इंडिया' (Baby India) असं नामकरण केलंय. या चिमुरडीचे आई-वडील कोण आहेत? हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. कमिंग शहराच्या पोलीस विभागानं या चिमुरडीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओतून या चिमुरडीचे जन्मदाते शोधून काढण्यासाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं. कोणत्याही प्रकारची सूचना मिळल्यास संपर्क करण्यासाठी माहिती देण्यात आलीय. सूचना देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असंही सांगण्यात आलंय. पोलिसांनी मंगळवारी हा व्हिडिओ जाहीर केलाय. 

या व्हिडिओतून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी रात्री जवळपास १० वाजल्याच्या सुमारास एका निर्जन स्थळी इथून जाणाऱ्या एकाला चिमुरडीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानं याबद्दल ताबडतोब पोलिसांना सूचना दिली. पोलीस अधिकारी पोहचले तेव्हा त्यांच्या शरीरावर लावलेल्या कॅमेऱ्यात नवजात बालक सापडल्याची संपूर्ण घटना कैद झाली. पहिल्यांदा पोलिसांनी या चिमुरडीचे नातेवाईक सापडतायत का हे चाचपडून पाहिलं... पण त्यांच्या हाती निराशा लागली. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी हा व्हिडिओ जारी करून या चिमुरडीच्या जन्मदात्यापर्यंत पोहचण्यासाठी जनतेला मदतीचं आवाहन केलंय.

या चिमुरडीची प्रकृती स्वस्थ असल्याचं समजतंय. विश्वसनीय सूचना मिळवण्यासाठी या चिमुरडीचा व्हिडिओ जाहीर करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. 

सोशल मीडियावर #BabyIndia सहीत शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर खूपच भावूक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्याचं दिसतंय. शेकडोंच्या संख्येनं लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.