Mecca Madina: आकाशातून जाणारं विमान ही तशी काही नवीन गोष्ट नाही. मात्र प्रत्येक ठिकाणी आकाशातून जाणारी विमान पहायला मिळतातच असं नाही. खास करुन नो फ्लाइंग झोनमध्ये आकाशात कधीच अशी विमानं उडताना दिसत नाही. नो फ्लाइंग झोनमध्ये (No Flying Zone) विमानच काय तर ड्रोन उडवण्यासही बंदी असते. जगात अशा काही मोजक्या जागा आहेत ज्या ठिकाणांवरुन आकाशात उडणारं विमान पाहता येत नाही कारण हे नो फ्लाइंग झोन आहेत. अशाच नो फ्लाइंग झोनमध्ये सौदी अरेबियामधील मुस्लिमांसाठी पवित्र मानलं जाणारं मक्का-मदीना शहरंही येतं. मक्का-मदीना शहरावरुन कोणतंही विमान उड्डाण करु शकत नाही. मात्र या शहरांना असणाऱ्या धार्मिक महत्त्वामुळे या शहरांवरुन विमानं का उडत नाहीत यासंदर्भातील चुकीची माहितीही व्हायरल होत असते.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी मक्का-मदीनेसंदर्भात एक मेसेज व्हायरल झाला होता. या मेसेजमधील दाव्यानुसार पृथ्वीचा केंद्रबिंदू हा मक्का आहे. येथे चुंबकीय क्षेत्र एवढं अधिक आहे की या शहरांवरुन विमानाने उड्डाण घेतलं तर विमानामध्ये तांत्रिक अडचणी येतात. मात्र यासंदर्भात अतापर्यंत कोणताही वैज्ञानिक अभ्यास झालेला नाही. तसेच याबद्दलचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळेच हा आधार नसलेला दावा आहे असं म्हणता येईल. मक्का किंवा काबावरुन विमान उडत नाही यामागील कारण हे धार्मिकच आहे. सौदी अरेबिया सरकारने हा संपूर्ण परिसर नो फ्लाइंग झोन घोषित केला आहे. सौदी सरकारच्या सांगण्यानुसार मक्का आणि काबाच्या क्षेत्रावरुन विमानांनी उड्डाण केल्यास येथे धार्मिक मान्यतांनुसार येणाऱ्या मुस्लिमांना तिर्थयात्रेत अडथळा निर्माण होईल. त्यांना धार्मिक कार्य करताना अडथळा निर्माण होईल. इस्लाम हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. अब्जावधी लोक या धर्माचं पालन करतात. दरवर्षी कोट्यावधी मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जातात. येथे प्रार्थना करुन लोक आपल्या अपराधांसाठी अल्हाची माफी मागतात.
सौदी अरेबियामधील सरकारने या क्षेत्राचं धार्मिक पावित्र्य आणि अध्यात्मिक वातावरण कायम ठेवण्यासाठी या प्रदेश नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित केला आहे. विमानांच्या आवाजामुळे हज यात्रेला येणाऱ्या भाविकांना त्रास होईल असाही तर्क लावला जातो. इस्लामचं पालन करणारे लोक आयुष्यभर हज यात्रा करण्यासाठी पैसे वाचवतात. अशावेळी त्यांना हजमध्ये येऊन चांगला अनुभव मिळावा यासाठी स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र येथे विमान उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. शहरांचं एरियल फुटेज घेण्यासाठी पत्रकार आणि संस्थांना काही अटी शर्थींसहीत परवानगी दिली जाते. मात्र फारच कमी वेळा अशी परवानगी दिली जाते.