सेलेब्रिटीजनी देहदान करावे

पुरातन काळापासून मृत शरीराला दफन अथवा दहन कण्याची परंपरा जगभर अस्तित्वात आहे.

Updated: Aug 27, 2018, 09:10 PM IST
सेलेब्रिटीजनी देहदान करावे

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही ॥

जयंत माईणकर : मनुष्य जसा जुने वस्त्र त्यागून नवे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर त्यागून नव्या शरीरात प्रवेश करतो. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एक श्लोक.  गीता , भारतीय संस्कृती चा एक अविभाज्य घटक. पुरातन काळापासून मृत शरीराला दफन अथवा दहन कण्याची परंपरा जगभर अस्तित्वात आहे.

वैद्यकीय क्षेत्रात झालेले लक्षणीय बदल आणि मानवी शरीराच्या अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात मानवाने केलेली लक्षणीय प्रगती पाहता मृत शरीर दाह- दफन संस्कार न करता वैद्यकीय अभ्यासासाठी देण्याची मागणी जोर धरू लागली. आज भारतात सुमारे दोन कोटी लोक आंधळे आहेत. जगात सर्वात जास्त आंधळे भारतात आहेत. नेत्रदान मोठ्या प्रमाणात केलं तरच ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. 

खरं तर गीतेच्या या श्लोकाच अनुकरण हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी सर्वप्रथम करून देहदनाचा एक नवा पायंडा पाडायला हवा होता. पण इथे उलट घडलं. याबाबतीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्योती बसू आणि सोमनाथ चटर्जी यांनी आदर्श घालून दिला. त्यांचा आदर्श हिंदुत्ववादी पक्षांनी ठेवायला हवा. 

ज्योती बसूना भलेही त्यांच्याच काही कॉम्रेडसनी पतप्रधानपदापासून वंचित ठेवले तरीही ज्योती बाबूंनी मात्र अंगीकारलेलं तत्त्व सोडलं नाही.  त्यांनी आणि त्यांचे शिष्य सोमनाथ चटर्जी या दोघांनीही म्हणून च देहदान केलं.देहदानाच महत्त्व केवळ मध्यमवर्गीयांना सांगण्यापेक्षा  सेलेब्रिटीजनी स्वतः देहदान करून आदर्श घालून दिला तर त्याचा फायदा जास्त होईल.

राजकारणी, अभिनेते, खेळाडू, उद्योगपती यांनी यात जर पुढाकार घेतला तर त्यातुन एक सामाजिक क्रांती घडवून येईल. तसा आदर्श शंतनुराव किर्लोस्करानी ठेवला होता आणि त्यांनी आपलं देहदान केलं होतं.

आज राजकारणी किंवा इतर सेलेब्रिटीजच्या अंत्ययात्रेवर आणि नंतरच्या अस्थी विसर्जन सारख्या प्रकारांवर किती अतोनात पैसा खर्च केला जातो आणि त्यात सरकारी खजिन्यातील पैसा किती असतो ही माहिती एखाद्या आर टी आय द्वारा सहज बाहेर येऊ शकते. पण ही रक्कम फार मोठी असते.

सेलेब्रिटीजनी  देहदान  केल्यास त्यांच्या  देहाची विटंबना होईल आणि ते योग्य नसेल असा युक्तिवाद  कोणी केल्यास तो अयोग्य असेल. कारण सामान्य माणूस जेव्हा देहदान करतो तेव्हा त्याच्याही देहाची विटंबना होऊ शकते.

आज देशात दरवर्षी सुमारे ५०,००० डॉक्टर तयार होतात. त्यांच्यापैकी कित्येक जणांना वैद्यकीय अभ्यासासाठी मृत शरीर मिळत नाही. अशा वेळेस त्यांना बेवारस मृत देह किंवा देहदान केलेल्या मृत देहांवरच अभ्यास करावा लागतो. आणि हा आकडा फार छोटा आहे. अनेक डॉकटर्स ना  अभ्यासासाठी कधीही मृत शरीर मिळत नाही.

कुठलीही गोष्ट कायद्यानी बाध्य केल्याशिवाय लोक मनात नाहीत. लॉर्ड बेंटिक नी जेव्हा कायद्यानी सतीसारखी अमानवीय प्रथा बंद केली आणि सती जाण्यास प्रवृत्त करणार्यांना  शिक्षेची तजवीज केली तेव्हाच ही कुप्रथा हद्दपार झाली. तसाच एक देहदानाविषयी कायदा केल्यास आणि गरज असलेल्या परिवारांना देहदनाच्या बदल्यात आर्थिक सहाय्य दिल्यास त्याचा अधिक योग्य परिणाम होईल.

तिहेरी तलाक सारख्या विषयाला हात घालणाऱ्या भाजप सरकारने त्यापेक्षा हा कायदा केल्यास देशाचे कल्याण होईल. पण त्याचबरोबर राजकारणी, अभिनेते, खेळाडू, उद्योगपती आणि इतर सेलेब्रिटीज नी स्वतः च सुद्धा देहदान करून नवा पायंडा घालावा.