WTC Scenarios For India If Brisbane Gabba Test Ends In Draw: ब्रिसबेनच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर स्पर्धेतील तिसऱ्या कसोटीमधील पराभवाच्या छायेतून भारत कसबसा बाहेर आला आहे असं म्हणता येईल. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे पाहुण्या संघाला फॉलोऑन टाळता आला. मात्र भारतीय संघ पाचव्या दिवशी 260 धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला 185 धावांची आघाडी मिळाली आहे. या सामन्यातील दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आता शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रातील काही ओव्हर वगळता ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. ही कसोटी अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे. सध्या मालिका 1-1 च्या बरोबरीत असतानाच कसोटी अनिर्णित राहिल्यास भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचण्याची शक्यता किती आहे? भारत कसोटी अनिर्णित ठेऊन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात कसा पोहचू शकतो याबद्दल क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. चला हेच समजून घेऊयात...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा विचार केल्यास भारताला आता त्यांच्या उर्वरित सर्व कसोटी जिंकणं अनिवार्य आहे. बॉर्डर-गावसकर चषकाच्या पहिल्याच कसोटीमध्ये भारताने तब्बल 295 धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. मात्र दुसऱ्या कसोटीत झालेला भारताचा पराभव आणि दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मिळवलेलं निर्भळ यश यामुळे भारतीय संघ तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे.
तिसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. भारताला सलग तिसऱ्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची संधी चालून आली आहे. ही संधी भारताला तिसऱ्या कसोटीत पराभव झाल्यास गमवावी लागेल. भारताने मेलबर्न आणि सिडनीमधील कसोटी जिंकली तरी भारताची विजयाची टक्केवारी 58.8 पर्यंत जाईल. दुसरीकडे सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानांवर होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धची मालिका पाहुण्यांना व्हाइट वॉश देत जिंकली तर त्यांच्या विजयाची टक्केवारी 60.5 टक्के इतकी राहील. त्यामुळेच भारताला बॉर्डर-गावसकर स्पर्धेत 3-2 असा विजय मिळाला तरी तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी पुरेसा ठरणार नाही.
3-2 च्या विजयानंतर भारताला श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला एखाद्या कसोटीत दमदार कामगिरी करावी यासाठी देव पाण्यात ठेवावे लागतील. तसेच पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तरच भारत 3-2 च्या फरकाने सध्या सुरु असलेली मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करु शकतो. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एखादी कसोटी जरी अनिर्णित राखली तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. ऑस्ट्रेलिया- श्रीलंका मालिकेतील एखादी कसोटी अनिर्णित राहिली तरी ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 57 च्या पुढे जाणार नाही. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज, बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
तिसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असून सध्याची स्थिती पाहिल्यास तिसरा सामना अनिर्णित राहणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सामना अनिर्णित राहिली तरी त्याचा जास्त फायदा भारताला होणार नाही. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी सिडनी आणि मेलबर्नची कसोटी जिंकवीच लागणार आहे.
भारताचा मेलबर्न किंवा सिडनीच्या कसोटीत पराभव झाला आणि मालिका 2-2 च्या बरोबरीत सुटली तर आगामी मालिकेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तरच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यामध्ये जाऊ शकतो. अशी स्थितीमध्ये भारताच्या विजयाची टक्केवारी 55.3 इतकी राहील तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 53.5 इतकी होईल.