मी पिंपरी चिंचवड बोलतोय...! (संवाद तिसरा)

ऐकताय ना...मी पिंपरी चिंचवड बोलतोय... या पूर्वी तुमच्याशी तीनदा बोललो...! त्यावेळी गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला म्हणून संतापाने बोललो...

Updated: Nov 6, 2018, 06:59 PM IST
मी पिंपरी चिंचवड बोलतोय...! (संवाद तिसरा) title=

कैलास पुरी, झी मीडिया, मुंबई : ऐकताय ना...मी पिंपरी चिंचवड बोलतोय... या पूर्वी तुमच्याशी तीनदा बोललो...! त्यावेळी गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला म्हणून संतापाने बोललो...! आज मी पुन्हा तुमच्याशी बोलतोय...! पण संतापाने नाही हतबलतेने...! ज्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी नैतिकतेच अधिष्ठान बळकट करत जगण्याचा मूलमंत्र दिला त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मला, या पिंपरी चिंचवडला त्याचा केवढा अभिमान...! 

महान साधू मोरया गोसावी यांची परंपरा जपणारं शहर म्हणून ही माझा लौकिक... ही परंपरा जपताना शहराने बेस्ट सिटी, विकासाचे मॉडेल हा टप्पा पार करत आधुनिकतेची कास धरल्याचा मला अभिमान...! 

पण हा अभिमान सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांनी केंव्हाच गळून पडला.... कधी हत्या, कधी तोडफोड तर कधी गोळीबार या घटनांनी मी केंव्हाच हतबल झालो...! शहरात नवीन पोलिस आयुक्तालय झाले आणि मला थोडीशी आशा निर्माण झाली.पण हा आनंद केंव्हाच ओसरलाय...! 

आयुक्तालय झाले आणि शहरातल्या कोवळ्या कळ्या, चिमुरड्या वासनांध नराधमांच्या शिकार होऊ लागल्या आहेत...! देवाच्या दर्शनाला जाणाऱ्या त्या कासारसाई च्या दोन चिमुरड्यांवर चार नराधमांनी बलात्कार केला आणि माझे उरले सुरले धैर्य ही खचलंय...! 

त्यांच्या वेदनांचा आवाज माझ्या कानात घुमत असतानाच शेजारच्याच काकाने भांडणाचा राग धरून ७ वर्ष्याच्या चिमुरडीचा हत्या केल्याचं वृत्त माझ्या कानावर धडकलं....! आणि आज पुन्हा एक चार वर्षाची नाजूक कळी वासनेने बरबटलेल्या एका शैतानाची शिकार झाली आणि मी पुरता हतबल झालोय...

संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांची, मोरया गोसावींची परंपरा असलेलं हेच शहर का असा प्रश्न मला पडला....! आधी गुन्हेगारी मुळे संतापाने बोललो पण आज हतबलतेने बोलतोय...त्या चिमुरड्याप्रमाणे!  हे शहर संतांच्या परंपरेचं नाही तर वासनांध नराधमांचं शहर होण्याची भीती मला वाटू लागलीय...! 

आयटी हब, विकासाचं मॉडेल, बेस्ट सिटी नाही तर कोवळ्या चिमुरड्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू येणार शहर म्हणून त्याची वाटचाल होईल....! घरातून बाहेर पडताना, शाळेत जाताना चिमुरड्यांचा श्वास गुदमरला जातोय, ते शहर म्हणजे पिंपरी चिंचवड अशी ओळख होण्याची भीती मला वाटू लागलीय.

म्हणून शहरवासियांनो, राजकारण्यांनो आणि पोलिसांनो हतबल झालेल्या माझ तुम्हाला जीवाच्या आकांताने सांगणे आहे.

वेळीच या घटनांना आवर घाला...! घरात आपल्या हसण्याने आनंद भरणाऱ्या, उद्या कोणाच्या तरी घराची लक्ष्मी होणाऱ्या, निरागस हसण्याने किती तरी आई वडिलांचा थकवा क्षणार्धात घालवणाऱ्या या कोवळ्या चिमण्यांना मायेची ऊब कायम मिळू द्या... त्यांच्या भाव विश्वावर या वासनांध नराधमांच्या पंजाचे ओरखडे उमटणार नाहीत याची काळजी घ्या...!

नाही तर या शहरातल्या कळ्यांचा आवाज अंधकारात गुडूप होऊन जाईल आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या तुम्हाला मला माफ करणार नाहीत....! म्हणून या चिमुरड्या कळ्यांना जपा... हात जोडून विनंती...!

एकीकडे या नराधमांमुळे शहरातल्या चिमुरड्यांचा जीव गुदमरला असताना मुर्दाड प्रशासनामूळही मी हतबल झालोय...! पोलिस काय किंवा पालिका प्रशासन काय त्यांनी केलेल्या डोळेझाकी मुळे सर्वसामान्यांचा जीव कवडीमोल झाल्याचे शल्य मला बोचते आहे.

नराधमांकडून चिमुरड्याना लक्ष केले जात असल्याच्या दु:खातून बाहेर पाडण्याचे शल्य बोचत असताना चीनी मांजा मुळे गळा चिरल्याने डॉक्टर कृपाली निकम या २६ वर्षीय तरुणीचा बळी गेल्याचे वृत्त माझे चित्त संतापाने विचलित करतेय...! मूळची जळगावची कृपाली.

कृपालीला पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णालयात नोकरी लागते...तेच वृत्त नातेवाईकांना देण्यासाठी, ती आनंदाने घराच्या बाहेर पडते काय, आणि गळ्यात मांजा अडकून रस्त्यावर विव्हळत जीव सोडते काय.

२० मिनिटे विव्हळणाऱ्या कृपालीला रस्त्यावरून जाणाऱ्यांकडून मदत मिळत नाही. हे कसले शहरातल्या माणुसकीचे मुर्दाड दर्शन! उद्या कृपालीच्या जागी तुम्ही आम्ही असू शकता! 

पण बोलणार काय म्हणा, या जिथे कायदा सुव्यस्था राखण्याची जबाबदारी राखायची जबाबदारी असलेले पोलिस, ज्यांच्यावर शहराच्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी असलेले सत्ताधारी नेते, आपल्या आपल्या सुखी विश्वात रममाण आहेत. तिथे तुमच्या सारख्या सामान्यांकडून माणुसकीची ती काय अपेक्षा म्हणा...!

हे झाले पिंपरी चिंचवडचे... पण मोठा भाऊ असलेल्या पुण्यात काही वेगळी स्तिथी आहे असे नाही. झोपी गेलेल्या व्यवस्थेमुळे कालवा फुटतो काय. हातावरचे पोट असणाऱ्या अनेकांचे संसार उध्वस्थ काय होतात. कुणी मुलाला डॉक्टर करण्यासाठी, तर कुणी लग्नासाठी साठवलेले पैसे पाण्यात वाहून काय जातात. राजकारणी येऊन फोटो सेशन करून काय जातात....! 

आहो, कालव्याची दुरावस्था झाली हे माहीत असून, त्याकडे दुर्लक्ष होतेच कसे. अर्थात या प्रश्नाचा झोपलेल्या प्रशासनाला काही फरक पडेल असा नाही म्हणा. कारण कालवा फुटला तर उघड्यावर संसार पडतील, ते सर्वसामान्यांचे. त्यांचा शामियाना मात्र आबाद राहिलं.

दुसऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन जगण्यात धन्यता मानणाऱ्या या प्रशासनाला आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा दिसतील कशा....जे कालव्याचे तेच होर्डिंग दुर्घटनेचे.

आहो दिवसा होर्डिंग पाडायला नको, जर पाडायचे असेल तर किमान सुरक्षिततेचे उपाय करायचे..पण त्याची चिंता करणारे ते कोण म्हणा... त्यांना माहीत आहे...भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या व्यवस्थेत त्यांच्या केसालाही कोणी हात लावू शकत नाही. भले दुर्घटनेत चार काय चाळीस जाऊ द्या...!

सर्वसामान्य जनता सहन करण्यासाठीच जन्माला आलीय. ती पुण्यातली असो नाही तर पिंपरी चिंचवड मधली...पण राजकारण्यांनो, पोलिसांनो आणि प्रशासकीय व्यवस्थेतल्या बाबू लोकांनो, आज सर्वसामान्यांची वेळ आलीय. उद्या तुमची ही येऊ शकतेय.

होर्डिंग पडून ज्या रिक्षातला शिवाजी परदेशी गेला आणि त्याची दोन मुले पोरकी झाली त्यात तुमच्यातला एक नसणार आहे कशावरून...! होर्डिंग काय गरीब, श्रीमंत बघून पडणार नाही.

आज कालवा फुटून सर्वसामान्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली, असंख्य स्वप्ने पाण्यात वाहून गेली, उद्या धारण फुटून तुमचे बंगले वाहून जाणार नाहीत कशावरून.

आज चिनी मांजात कृपालीचा गळा चिरला , उद्या तो मांजा तुमच्या गळ्यात अडकणार नाही कशावरून... वासनांध नराधम गरिबांच्या चार पाच वर्षांच्या चिमुरड्याना वासनेने लक्ष करत आहेत. उद्या ते तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहचणार नाहीत कशावरून..

म्हणून एकच विनंती...दिलेले काम किमान गांभीर्याने पार पाडा. नाहीतर आग तुमच्यापर्यंत पोहचल्या शिवाय राहणार नाही...! "कुछ तो लिहाज करो देश का...."