जनसंघर्ष यात्रा : निवडणुकीत भाजपला घेरण्याची काँग्रेसची तयारी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रेचं आयोजन ३१ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

Updated: Sep 3, 2018, 10:23 PM IST
जनसंघर्ष यात्रा : निवडणुकीत भाजपला घेरण्याची काँग्रेसची तयारी

जयंत माईणकर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रेचं आयोजन ३१ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. एकूण पाच भागात होणाऱ्या या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सामील होण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात प्रगतीशील आर्थिक दृष्ट्या ताकदवान असलेल्या या राज्याला काँग्रेस फार महत्त्व देत आहे

.माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे स्वतः या संघर्ष यात्रेत सहभागी होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा वास्तविक पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. 

पण २०१४ पासून या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले. नुकत्याच झालेल्या सांगली महानगर पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे, आणि त्यामुळेच की काय राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या या साखर सम्राटांच्या भागापासून काँग्रेसने आपल्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे.

एकूण पाच भागात ही संघर्ष यात्रा एक प्रकारे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची नांदी ठरणार आहे. प्रचारात नोटबंदी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. 

राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षांबरोबर निवडणुकीत जागा वाटप होईल, असं जरी काँग्रेसनी जाहीर केलं असलं तरी, ही पश्चिम महाराष्ट्रापासून आपल्या यात्रेची सुरुवात करून काँग्रेसने एक प्रकारे राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार हे लोकांची फसवणूक करणारं, फसवणीस सरकार असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी या सर्व मुद्द्यांवर फडणवीस सरकारने जनतेची फसवणूक केल्याचं चव्हाण सांगतात.

१९७१ पासून २०१४ पर्यंत सर्व निवडणुका जिंकणारे खर्गे सध्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. एक मुरब्बी आणि अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकनिष्ठ असून त्याची चव घेतल्यास काय होईल, हे सर्वांना माहीत असल्याने, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनसंघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले तरी जाऊ नये, असा समर्पक सल्ला पक्षाध्यक्षांनी दिला आहे. 

एकूण या जनसंघर्ष यात्रेने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघेल, आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल हे निश्चित.