ब्लॉग : 'भय इथले संपत नाही' अशी पिंपरी चिंचवडची स्थिती, जबाबदार कोण ?

महापालिकेची यंत्रणा आणि महापालिका प्रमुख म्हणून आयुक्त राजेश पाटील जबाबदार

कैलास पुरी | Updated: Apr 17, 2021, 08:57 AM IST
ब्लॉग : 'भय इथले संपत नाही' अशी पिंपरी चिंचवडची स्थिती, जबाबदार कोण ? title=

कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड :  देशात, राज्यात तुम्ही राहताय, त्या शहरात जी भयावह स्तिथी कोरोनाची आहे तीच स्तिथी पिंपरी चिंचवड शहरात आहे. सरासरी 20 ने होणारे मृत्यू, 2500 ने वाढणारी रुग्णसंख्या आणि कोलमडून पडलेली आरोग्य यंत्रणा. हे विदारक चित्र सध्या शहरात दिसत आहे. अर्थात याला सर्वस्वी यंत्रणा जबाबदार आहे असे ही नाही, काही हौशी मंडळी जी विनाकारण रस्त्यावर फिरतेय, नियमांचे उल्लंघन करतेय, त्यांचा ही वाटा या या भयावह परिस्तिथीला कारणीभूत आहे. परंतू सर्वाधिक जबाबदार आहे ती महापालिकेची यंत्रणा आणि अर्थातच महापालिका प्रमुख म्हणून आयुक्त राजेश पाटील..! 

कोरोनाचा शिरकाव शहरात झाल्यानंतर सुरुवातीला महापालिका प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगली पावले उचलली खरी, परंतू आता मात्र शहरात भयावह स्तिथी आहे. दररोज सकाळी उठल्यावर व्हाट्सऍप ग्रुप किंवा फेसबुक पोस्टमध्ये कोण तरी जवळचा गेल्याची बातमी कळतेय. 

महापालिकेचे प्रमुख रुग्णालय असलेल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील परिस्तिथी भयानक आहे. मंडप टाकून रुग्णांचे सुरू असलेले उपचार, जमिनीवरच झोपलेल्या रुग्णाला ऑक्सिजन लावून सुरू असलेले उपचार शहराच्या आरोग्य यंत्रणेची काय अवस्था आहे हे सांगायला पुरेसे आहे. मात्र असे असले तरी त्यावर उपाययोजना करण्यासाठी शहरात यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न पडावा एवढी उदासीनता अधिकारी, प्रशासन आणि आयुक्तांकडून पाहायला मिळत आहे....!

प्रतिकूल परिस्तिथीत शिक्षण घेत आयएएस झालेल्या राजेश पाटील यांना गरिबी नेमकी काय असते ? याची नक्कीच कल्पना असणार. त्याशिवाय आयएएस होण्याचा त्यांचा खडतर प्रवास इतरांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी पुस्तकरूपी आणलाही नसता. म्हणूनच कोरोना काळात गोर गरीब, सर्वसामान्यांसाठी ते भरपूर काही करतील अशी अपेक्षा अनेकजण बाळगून होते. असे असले तरी एकूणच शहरातील परिस्तिथी पाहिली तर त्यांनी केलेले उपाय शहरातील भयानक परिस्तिथी सुधारण्यास काडीचे उपयोगी पडत नाहीत अशीच स्तिथी आहे. 

आयुक्त म्हणून त्यांचा कालावधी काही महिन्यांपूर्वी सुरू झाला आहे. परंतू संकटाच्या काळात कणखर भूमिका घेत आरोग्य यंत्रणा सुधारण्याची मोठी संधी त्यांना होती. 

मात्र त्यांनी आरोग्य यंत्रणा सुधारण्या कडे लक्ष देण्या ऐवजी उन्हाळ्यात स्वेटर आणि शाळेत मुले नसताना गणवेश वाटण्यातच धन्यता मानली असे म्हणायला त्यांनी त्यासाठी दाखवलेल्या तत्परतेने बराच वाव आहे. 

हीच तत्परता त्यांनी व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड आणि इतर सुविधा पुरवण्यावर दाखवणे अपेक्षित आहे. मात्र तिथे त्यांची तत्परता कमी पडतेय हे शहरात बिघडत चाललेल्या परिस्थितीवरून स्पष्ट जाणवते. 

शहरातल्या कोणत्या ही रुग्णलयात जा, कोणी तरी आपला गेलाय हे पाहून हुंदका देणारी माणसे, औषध मिळत नाही म्हणून या मेडिकल वरून त्या मेडिकल वर चकरा मारणारी हवालदिल माणसे, उपचार सुरू होईल म्हणून लाईन मध्ये उभी असलेली माणसे असेच हृदयद्रावक चित्रं सध्या दिसतंय. त्यांच्या दु:खाला, वेदनांना कुणी फुंकर घालणारा आहे की नाही अशी स्तिथी सध्या अनुभवायला येतेय. 

ही स्तिथी बदलण्याची जबाबदारी आयुक्त राजेश पाटील यांची आणि यांचीच आहे. त्यांनी ती पार पाडावी ही अपेक्षा जनतेने बाळगणे नक्कीच गैर नाही. कोरोनाच्या शहरातल्या अक्राळ विक्राळ रुपाला सावरणे गरजेचे आहे. आणि ते आयुक्त म्हणून राजेश पाटील यांनीच करणे गरजेचे आहे. अन्यथा शहराची अवस्था अंधेर नगरी चौपट राजा अशीच आहे असे खेदाने म्हणावे लागेल...! 

जाता जाता : - शहरातल्या राजकारण्यांवर तर न बोललेच बरे..आपदा मे अवसर नुसार अनेकांनी या महामारीत हात धुवून घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत..! काही नी एकाही रुग्णाचा उपचार न करता करोडो रुपये उकळणाऱ्या कोविड सेंटर मध्ये भागीदारी करण्यात आणि त्यातून पैशांचा 'स्पर्श' घेण्यात धन्यता मानली...काहींनी मास्क खरेदीत हात धुवून घेतला...! आणि अजून ही त्यांना शहरातल्या नागरिकांचे काही सोयर सुतक आहे अशी स्तिथी नाही..! म्हणून तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्हीच काळजी घ्या...!  शहराची स्थिती 'भय इथले संपत नाही' अशी आहे आणि आणखी किती काळ ती अशी राहील हे सध्या तरी सांगणे कठीण आहे...!