('लव्हिंग विन्सेन्ट' या सिनेमातून विन्सेन्ट हा चित्रकार त्याच्या 'युअर लव्हिंग विन्सेन्ट' असा शेवट असलेल्या प्रेमळ पत्रांतूनच उलगडत जाताना दिसतो. म्हणून विन्सेन्टचा आणि सिनेमाचा परिचयही पत्राच्या स्वरुपातच करून देण्याचा हा एक प्रयत्न...)
डिअर विन्सेन्ट,
खरं म्हणजे तुझी नुकतीच ओळख झालीय... पण जसजशी ही ओळख वाढत गेली तसतशी तुझ्याबद्दल आणि तू रेखाटलेल्या चित्रांबद्दल उत्सुकता वाढतच गेली... त्याहूनही जास्त म्हणजे, तुझ्याशी ओळख करून देणाऱ्या एका वेगळा प्रयोग करू पाहणाऱ्या कलाकृतीच्या तर मी प्रेमातच पडलेय...
'लव्हिंग विन्सेन्ट' नावाचा जवळपास दीड तासांचा सिनेमा नुकताच पाहिला. तेव्हापासून तुझ्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढत गेली... नाहीतर १८८०-९० च्या 'ब्लॅक अॅन्ड व्हाईट' जमान्यात विन्सेन्ट वॅन गॉग (Vincent Van Gogh) नावाचा कुणी डच चित्रकार अस्तित्वातही होता, हे माझ्या गावीही नव्हतं... मग त्यानं रेखाटलेली जवळपास २१०० चित्रांशी तरी परिचय कसा असेल?
पण तरीही गेल्या वर्षातला सर्वात प्रयोगशील सिनेमा कुठला? असा प्रश्न मला कुणी विचारला तर त्याचं उत्तर नक्कीच 'लव्हिंग विन्सेन्ट' हेच असेल... म्हणावा तर सिनेमा म्हणावा तर चित्रांचा अल्बम... तुझ्या जीवनाला आणि मृत्यूलाही अर्पण करण्यात आलेला हा चित्रपट तुझ्याच ‘पेन्टिंग स्टाईल’नं मोठ्या पडद्यावर आणला गेलाय. गेल्या वर्षी हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला. ३ नोव्हेंबरला भारतात प्रदर्शित झालेल्या हा सिनेमा एक महिनाभरही थिएटरमध्ये टिकू शकला नव्हता, हे विशेष...
दीड तासांच्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न् फ्रेम चित्रांनी रंगवलेली असू शकते, यावर विश्वासही बसत नाही... पण हा सिनेमा पाहिल्यावर त्यासाठी सिनेमाच्या मागे किती हातांनी किती अपार कष्ट घेतले असतील, याची प्रचिती मात्र लगेचच येते. तब्बल ६५,००० फ्रेम्स कॅन्व्हासवर रंगवून या ‘अॅनिमेटेड’ चित्रपटाचा पाया रचला गेला. एखाद्या कलाकाराला त्याच्या स्टाईलमून आदरांजली देणारा हा एक वेगळाच अनुभव... पेन्टिंग्सच्या फ्रेम्स एकमेकांना जोडण्यासाठी अॅनिमेशनचा वापर करण्यात आलाय. चित्रांना चेहरा देण्यासाठी या सिनेमात कलाकारांचाही वापर करण्यात आलाय.
मला चित्रांमधलं फार कळतं असं मी म्हणणार नाही... पण, हो प्रत्येक चित्रामागची मेहनत मात्र हा सिनेमा पाहत असताना प्रत्येक क्षणी जाणवते... खरं म्हणजे, व्हिडिओ शूटिंग केलेला चित्रपट पाहतानाही एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये प्रवेश करताना कधी कधी ‘जर्क’ जाणवातात... पण, चित्रांच्या या खजिन्यात एका फ्रेममधून दुसऱ्या फ्रेममध्ये जातानाही जर्क जाणवत नाही, हे महत्त्वाचं... कदाचित कॅन्व्हासवर रेखाटलेल्या चित्रांचा या ‘ट्रान्झिशन’मध्ये उपयोगच झालाय, असं वाटतं... त्यासाठी चित्रपटाच्या एडिटिंगला क्रेडिट द्यावचं लागेल.
एक व्यक्ती कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कोणतंही प्रशिक्षण नसताना वयाच्या २८ व्या वर्षी चित्र काढायला सुरुवात करतो काय... पुढच्या केवळ दशकभराच्या कालावधीत तो तब्बल २१०० कलाकृती तयार करतो काय... आणि वयाच्या ३८ व्या वर्षी त्याचा अपघाती मृत्यू होतो काय? हे सगळंच अफाट वाटत राहतं... आणि त्याच्या मृत्यूइतकंच गूढही...
डोरोटा कॉबिएला आणि ह्यू वॉल्चमॅन यांच्या नजरेतून आणि प्रचंड विश्वासातून या सिनेमाची प्रत्येक फ्रेम एका हरवलेल्या चित्रकाराला पुन्हा जिवंत करण्याचं काम करतेय... सध्या आर्ट क्षेत्रात वावरणाऱ्यांना हा सिनेमा नक्कीच नवी दिशा देऊ शकेल... या चित्रपटाच्या समिक्षेच्या भानगडीत मी पडणार नाही... पण मोठ्या पडद्यावरचा हा एक ‘आर्टिस्टिक मास्टरपिस’ आहे, असं मात्र नक्कीच म्हणू शकेल. या सिनेमाच्या निमित्तानं का होईना, तुझ्याशी ओळख झाली हेही नसे थोडके...
- युअर लव्हिंग शुभा