कारागिरांच्या भाऊगर्दीतील एकटा कलाकार

शेन वॉर्न गेला ह्या धक्क्याचा eqivalent हा 9/11 ला विमाने न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेंड सेन्टर(WTC) वर धडकली ते बघताना जो बधिरपणा आला होता हा असेल. 

Updated: Mar 7, 2022, 05:39 PM IST
कारागिरांच्या भाऊगर्दीतील एकटा कलाकार title=

रवि पत्की, क्रिकेट समीक्षक, मुंबई : शेन वॉर्न गेला ह्या धक्क्याचा eqivalent हा 9/11 ला विमाने न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेंड सेन्टर(WTC) वर धडकली ते बघताना जो बधिरपणा आला होता हा असेल. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मनोऱ्याचा एक मजला दीड वर्षापूर्वी डीन जोन्स गेला तेव्हा ढासळला होता.

दुसरा मजला काही महिन्यात ऍशली मॅलेट गेला तेव्हा ढासळला.तिसरा रॉड मार्शच्या नावाचा होता.आणि आता वॉर्न मुळे अक्खा मनोराच ढासळला. ग्राउंड झीरो झालं. अगदी 9/11 ला झालं होतं तसं. वॉर्नची बातमी ऐकून पहिल्यांदा वाच्याच बसली.मग विचार खुंटले.मग लिहिता येईना(Dysgraphia).कुठल्यातरी दक्षिण गोलार्धावरील या इसमाशी आपलं नातं तपशीलापालिकडचं होतं एव्हढं खरं.

तो आंतरराष्ट्रीय मंचावर अचानक उशिरा येणाऱ्या पावसा सारखा आला. तो अवतरला तेव्हा स्पिन विभागात मुरली आणि कुंबळे राज्य करत होते.कुंबळे निम्मा फास्ट बॉलर होता तर मुरलीची ऍकशन पटत नव्हती.अशावेळेस एक स्पिनचा प्युअर फॉर्म दिसणं क्रिकेटची गरज होती.

तो अवतरला म्हणायचं कारण तो गॉड सेंड होता.अद्भुततापूर्ण आणि चमत्कारप्रवण. प्रतिभेचा धनी.प्रतिभा तशी चंचल स्वामिनी आहे.काही लोकांना आयुष्यात ती ओझरते दर्शन देऊन जाते.ज्यांच्याकडे ती कायम स्वरूपी निवासाला येते त्यांनी कमीतकमी सहा जन्म रियाज केलेला असतो.वॉर्न सहा जन्म त्याच्या बॅकयार्डमध्ये लेग स्पिन टाकून टाकून शेवटी सातव्या जन्मात वॉर्न म्हणून जन्माला आला असणार.

पाखरू पंख घेऊन जन्माला येते तसा तो चेंडू घेऊन जन्माला आला.अनेक लोकांनी स्पिन गोलंदाजी टाकली पण वॉर्नने एकट्याने ती पेश केली.तो नुसता कलाकार नव्हता तर कलाकारातला खाँसाहेब होता.शास्त्र,तंत्र,विद्या आणि कलात्मकता या कलेच्या चारही अंगात त्याची रसनाग्रनर्तकी विद्वत्ता होती.

मिडविकेट मोकळा सोडून बॅट्समनला स्पिनच्या विरुद्ध खेळायला लावून कॉट अँड बोल्ड घेणे,कव्हर्स मोकळा सोडून स्लिप मध्ये गिळणे असे डावपेच तो लीलया यशस्वी करत असे.मार्क टेलर,मार्क वॉ अशा महाचपळ फिल्डर्सनी त्याला शिखरावर न्यायला सिंहाचा वाटा उचलला. 

प्रत्येक चेंडू किती वेगाने आणि परिभ्रमणाने(revolutions)नी टाकायचा,क्रिझच्या कुठून टाकायचा,किती फ्लाईट देऊन टाकायचा,कुठल्या लेंथवर टाकायचा या तंत्रात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही.चेंडू त्याचा गुलाम होता.बस म्हणलं की बसायचा उठ म्हणलं की उठायचा.त्याच्या या नियंत्रण आणि अचुकतेचे सगळे दिवाने होते. त्या करता कामावर अविचल निष्ठा आणि पॅशन असावी लागते.त्याचा लेगस्पिन अचुकतेच्या वर्तुळाचा माध्यबिंदूला स्पर्श करत असे.तसेच तो कितीही वळत असे.

गॅटिंगला टाकलेला चेंडू प्रतिभेच्या उन्मेषाचा दैदिप्यमान उच्चांक होता.लेगस्पिन आणि फ्लिपर ही त्याच्या विद्यादप्तरातील दोन सर्वोच्च अस्त्रे.गुगली तो कमी टाकायचा.गायकाची सुरावर हुकूमत असेल तर त्याला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत.तसेच वॉर्नचे होते.त्याचा लेगस्पिनच हुकमी एक्का होता.त्याचा फ्लिपर शॅमेलियॉनच्या जिभेसारखा होता.

प्रचंड वेगात बाहेर पडून भक्ष टिपत असे.हा सर्व ऐवज घेऊन तो जेव्हा बॉलिंगला यायचा तेव्हा त्याच्या कलात्मकतेने,उनमुक्तीने,अभिनयाने क्रीडांगणाचे ओपन एअर थिएटर होऊन जात असे. संपूर्ण शोमन होता तो.हीच त्याची शोमनशीप बघायला जगातील स्टेडियम्स खचाखच भरत असत.नंतर नंतर त्याच्या रेप्युटशनची बॅट्समननी इतकी धास्ती घेतली की ते त्याचा फूलटॉस पण डिफेन्ड करायला लागले.(भारतीय बॅट्समन अपवाद).

नाकाला लावलेले झिंक क्रिम,ब्लॉन्ड केस,कानात डुल आणि हातात जादू.हिरो होण्यासाठी अजून काय लागतं? त्याची प्रसद्धी सर्वव्यापी होती.इतर खेळातील,क्षेत्रातील सेलिब्रिटी लोक त्याचे मुरीद होते.ख्रिस मार्टिन,मिक जॅगर,एलटन जॉन म्हणजे त्याचे प्रचंड फॅन होते. त्याच्या हातात चेंडू इतक्या जलद गतीने आणि जोरात वळवण्याची शक्ती कुठून आली? 

लहानपणी एका अपघातात त्याचे दोन्ही पाय फ्रॅकचर झाले होते.तेव्हा त्याला हाताने चाकाची खुर्ची ढकलत जावे लागत असे.असे तो वर्षभर करत होता.बहुधा त्यामुळे त्याच्या हातातील strength वाढली असावी. त्याला शेक हॅन्ड केलेले लोक सांगतात की त्याचा हात लोखंडी होता.

प्रतिभा आणि स्वतः वरील नियंत्रण(फ्रॉईडच्या भाषेत सुपरईगो)यांचे नाते विळ्या भोपळ्याचे असते.त्याचे वैयक्तिक आयुष्य चांदणी होते.रंगीबेरंगी.त्याचं आयुष्य जीवनाने आकंठ भरलेलं होतं.त्याची अनेक scandals गाजली.त्याच्याबद्दल सर्वसामान्य गैरसमज म्हणजे त्याला मद्य प्रिय होते.

हे साफ चूक होते.खेळ संपल्यावर त्याच्या नावाची त्याच्या सीटवर ठेवलेली बिअरची बाटली अनेकदा तिथेच न फोडलेल्या अवस्थेत असे. बाकी त्याने पुष्कळ affairs केली ज्याचा त्याच्या कुटुंबाला खूप त्रास झाला.परंतु त्यांच्या तिन्ही मुलांवर त्याचे निरातिशय प्रेम होते आणि तो ते जाहीर करत असे.

कंमेंटरी बॉक्स मध्ये समालोचक म्हणून  त्याची नुसतीच तज्ञता नाही तर रसज्ञाता अनुभवायला मिळाली.त्याच्या कमेंट्स बुद्धी आणि भावना यांना एकाचवेळेस आवाहन करत असत.त्याची विद्वत्ता अशी होती की पुढल्या चेंडूवर बॅट्समन काय करणार आहे हे तो ओळखत असे.तो कंमेंटरी करताना खेळाडू म्हणून तो किती धूर्त होता ह्याचा अंदाज येई. 

गंमत म्हणजे एव्हढं सगळं असून त्याला सेल्फ डाउट ने पछाडले होते.कंमेंटरी झाल्यावर तो पत्रकारांना विचारात असे 'बरा बोललो का हो मी'? हा सेल्फ डाउट त्याच्या गोलनदाजीच्या वेळेस देखील होता हे ऐकल्यावर आश्चर्य वाटले.

वसंत ऋतू गुलमोहराच्या वृक्षाला जसे मोहरून टाकतो तसे त्याने त्याच्या अचाट प्रतिभिने आपल्या मनात रोमांच्याचे तटतटून येणारे ताटवे फुलवले.केव्हढा आनंद दिला त्याने आपल्याला.दृष्टी आणि श्रुती दोन्ही धन्य केल्या त्याने.

पण आता तो लेगस्पिन नाही,फ्लिपर नाही,झूटर नाही.ते बॅट्समनला धूर्तपणे खजिल करणं नाही.गॅटींग पुन्हा मामा होणं नाही. इयन हिली तरी आता कुणाकरता ओरडणार....बॉलिंग, शेन!