...म्हणून संवेदना जिवंत राहतात

झी 24 तासाच्या अँकर/प्रोड्युसर सुवर्णा धानोरकर यांनी मुलं पालकांना कशी रोजच्या प्रसंगातून काही ना काही शिकवून जातात हे मांडलंय. 

...म्हणून संवेदना जिवंत राहतात

सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : (झी 24 तासाच्या अँकर/प्रोड्युसर सुवर्णा धानोरकर यांनी मुलं पालकांना कशी रोजच्या प्रसंगातून काही ना काही शिकवून जातात हे मांडलंय. त्यांच्या मुलासोबतच त्यांचा संवाद आणि त्यातून त्यांना झालेली संवेदनेची जाणीव, त्यांच्याच शब्दात)

 मी-'काय झालं का रडतोय? कुठे लागलं? पडला का तू? कुणी मारलं?’

माझे प्रश्न सुरू होते आणि लेकराचं रडणं सुरू होतं.

शेवटी वैतागून मी म्हटलं, 'रडत रडत घरी येणार असशील तर उद्यापासून खेळायला जायचं नाही.’ लगेच रडता रडता शब्द जोडणं सुरू झालं.

विहान- 'मी आता खाली खेळत होतो ना, तर एक माणूस मोटी काटी घेऊन आला हॅपीला (सोसायटीत मुलांनी पाळलेली कुत्री) मारायला.’ 

मी-'अरे बीएमसीवाले असतील. सगळ्या कुत्र्यांना घेऊन जातील इंजेक्शन देतील आणि मग पुन्हा इथेच सोडतील.’ 

विहान- 'नाही. ते बी एम सी नवते. त्यांच्यासोबत त्यांचे २ मुलं पन होते. ते हॅपीच्या मागे धावत होते काटी घेऊन. ते मनत होते तिचा पाय तोडायचा आहे.’ 

मी- 'असं नाही करत कोणी. गम्मत केली असेल तुझी. असं कोणी मारेल कधी?’

विहान-'अरे हो. मी खरच सांगतोय. ते तिला मारायला आलेले. हॅपी त्यांच्या गाडीवर बसते तर गाडीवर स्कॅचेस आले, मनुन तिचा पाय तोडनाराय ते. मला नाही चालणार असं.’

मी- 'मग थांबावं तू त्यांना. सांग तिला मारू नका.’ 

काही वेळ असाच समजावण्यात गेला.

अधूनमधून रडणं, त्या काकांच्या नावे फुत्कारण सुरूच होतं.

विहान- 'तू प्रार्थना कर की हॅपीला काही नाही झालं. ती चांगली आहे. तिचा पाय पण चांगला आहे.’

मी- 'हो करते.’

विहान-'आत्ताच्या आत्ता कर.’

मी-'तू शांत बसलास तर मी प्रार्थना करेन.’

विहान-'बसतो. पन तू कर.’

थोड्या वेळाने 'आई! मी तुझा मुलगा हाय न? मग मला कोणी मारलं, माझा पाय तोडला तर तुला आवडेल का?’

मी- 'अजिबात नाही. पण असं कोणी का करेल. तू चांगला मुलगा आहेस.’ 

विहान-'मग मला कोणी मारलेला तुला आवडणार नाही तर मी पेट केलेल्या हॅपीला कोणी मारलेलं मला कसं आवडेल?’ 

मी-(बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं)

विहान- 'आई माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. काय करू तू सांग. हॅपीला मागच्या ग्राउंडमध्ये सोडून येऊ की, घरी आणू?’

मी- 'ग्राउंडमध्ये सोड.’

विहान-'ओके.’

मी- 'तू मोठा झाला की आपण भरपूर कुत्रे आणू

'विहान- 'माझ्या शेतात मी १ कुत्रा ठेवणार.’

मी-'१०० ठेव.’ 

हा संवाद इथेच थांबला. 

suvarna_dhanorkar 

विहान खेळायला गेला आणि मी हुश्श केलं. पण सकाळी वाचलेली आणि त्यानंतर मी विचार केलेली बातमी डोक्यातून काही जात नव्हती. बीएमसी सात श्वान वाहन देतेय मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी. 

बातमी वाचता वाचता डोक्यात विचार आलेला. एरियामध्ये कुत्रे वाढलेयत. लगेच गाडी बोलवते. हा विचार काही तासच डोक्यात राहिला. कारण घरी आल्यावर हॅपीपुराण घडलं. 

ऑफिसमधून घरी येताना संप्रदाशी बोलत होते. 

असा जुना कुठला तरी विषय निघाला आणि म्हटलं, 'संवेदनाच मेल्या आहेत ग. कशाचंच काही वाटत नाही आता. काहीही घडलं आसपास तरी मी न्युट्रल असते.’ त्यावर तीच म्हणणं होतं, 'चालायचंच.’ घरी आले आणि विहानने दाखवुन दिलं, काही क्षणापूरत्या संवेदना मेल्या असं वाटून जातं. पण श्वास आणि संवेदना हातात हात घालून असतात.

असे प्रसंग नेहमीच घडतात. पण काही लक्षात राहतात. शिकवून जातात, आणि काही प्रसंग असे असतात की त्यातून मुलंच आपले गैरसमज दूर करतात. माझ्याबाबतीत तर नेहमीच असं घडतं. विहान नेहमी शिकवत असतो. 

स्पेशली जेव्हा मला वाटतं की माझ्यातल्या संवेदना मेल्या. तेव्हाच नेमकं असं काहीतरी बोलतो/वागतो की मला मीच नव्यानं गवसते. माझ्या मनातही हळवा कोपरा अजूनही जिवंत आहे हे दाखवून देतो. आई नाही शिकवत, मुलंच आईला शिकवतात.  

तिच्यातल्या संवेदना जिवंत ठेवतात. कदाचित याच नात्यामुळे जगात अजूनही संवेदना, प्रेम, माया, ममता, सकारात्मक म्हणावं असं सारं काही जिवंत आहे. कवितेत म्हटलंय ना आई ही गाव असते, तसं मला वाटतं मुलं चालती बोलती शाळा असतात. तुमच्यातल्या संवेदना सतत जिवंत ठेवण्याचं काम करतात. तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवतात.