समाजात वावरणाऱ्या दोन प्रकारच्या महिला महिला दिसतात. निडरपणे आणि निमूटपणे जगणाऱ्या ही दोन्ही रूप एकाच वेळी पाहताना काय वाटतं? महिला दिनानिमित्त 'झी २४ तास'च्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सुवर्णा धानोरकर, मुंबई : 8 मार्च जवळ आला की सो कॉल्ड Women's Day म्हणजेच महिला दिनी काय काय करायचं याच्या तयारीला लागतात. केकपासून पिकनिकपर्यंत सगळे प्लॅन ठरलेले असतात. काही जणी तर या दिवसासाठी खास नवीन कपडे पण घेतात. आज महिला दिन साजरा करणं म्हणजे चार चौघींनी एकत्र येऊन पार्टी करायची? नाच गाणी, ड्रिंक, स्नॅक्स, जेवण करायचं? नाईट आऊटला जायचं? मैत्रिणींसोबत पिकनिकला जायचं? ऑफिसमध्ये सगळ्याजणींनी नटूनथटून जायचं आणि आज Women's Day आहे. आम्ही आज काम करणार नाही. असं नाक उडवून म्हणायचं ? नेमकं काय करायचं 8 मार्चला? शहरी, नीमशहरी भागातल्या आणि कामावर जाणाऱ्या महिलांना हा दिवस माहिती आहे. कामावर जाणाऱ्या महिलांच्या संगतीत राहणाऱ्या पण 24/7 जॉबवर असणाऱ्या ( आपण त्यांना शुद्ध भाषेत हाऊज वाईफ म्हणतो) काही महिलांना हा दिवस माहिती आहे. पण आपल्या घरी धुणीभांडी करणाऱ्या महिलांना हा दिवस माहिती आहे का? ( सध्या फेसबुक आणि वॉट्सअॅप घरोघरी पोहचलं आहे. त्यामुळं एखादीला माहितही असेल कदाचित) कचरा वेचक महिलेला हा दिवस माहिती आहे का? रुग्णालयांमध्ये आया, मावशी म्हणून काम करणाऱ्या महिलांना हा दिवस माहिती आहे का? शेतात काम करणाऱ्या, भाजी विकणाऱ्या, मजुरी करणाऱ्या, खडी फोडणाऱ्या, सिमेंटची पोती किंवा घमेली उचलणाऱ्या महिलांना हा दिवस माहिती आहे का? नसेलच माहीत... बरं आठ मार्चच्या तुमच्या सेलिब्रेशनबद्दल कामवाल्या बाईला सांगणार का? नाही. कारण तिनं त्या दिवशी सुट्टी घेतली तर कामाचा राहाटगाडा तुमच्या पुढ्यात असेल. असो. या अगदीच सामान्य गोष्टी.
महिला दिन का साजरा केला जातो याचं खरं कारण आपल्यापैकी कित्येकींना माहितही नसेल. महिला सबलीकरण या दिवसामागचा मह्त्त्वाचा उद्देश. पण साध्य होतोय का तो ? आपल्या आसपासची कोणी महिला सबल आहे का? आपण स्वत: सबल आहोत का? जरा विचार करा, दारु पिणारा नवरा, बायकोला आजही मारतो. कारण काय, तर तिच्याच घामाच्या पैशातून त्याला दारु प्यायची असते. तिच्या मदतीला जातो का आपण कधी? निदान असा विचार तरी कधी येतो का आपल्या मनात? नवऱ्यानं टाकलेल्या बायकोला समाजात काय स्थान आहे? विधवा महिलेला मिळतो का सन्मान? उलट तिच्याकडे तर असं पाहिलं जातं जणू काही तिनंच नवऱ्याला मारलं. हळदीकुंकू समारंभात एखाद्या विधवेला बोलवण्याची हिम्मत आहे कुणात? हळदीकुंकु कशाला, घरात शुभकार्य असलं की आजही विधवेला बोलवावं की नाही यावर चर्चा झडतात. चला विधवेचाही मुद्दा राहु द्या. एखाद्या विनयभंग झालेल्या, बलात्कार पीडित, अॅसिड हल्ला झालेल्या मुलीला देऊ आपण सन्मान? आहे तेवढं मोठं मन आपल्याकडे? एकवेळ पुरूष अशावेळी सकारात्मक भूमिका घेताना दिसतात. पण महिलाच महिलेशी चांगलं वागताना दिसत नाहीत. अगदीच साधं उदाहरण द्यायचं झालं तर लोकलमध्ये, बसमध्ये पुरूष जागा देतात बसायला. पण महिला मात्र ढुंकूनही बघत नाहीत. मग बलात्कार पीडित आणि विधवा तर दुरच राहिल्या. उलट या महिलांविषयी वाईटसाईट बोलायलाही आपण कमी करत नाही. तीच कशी चुकीची आहे हेच दाखवायचा आपला प्रयत्न असतो. घडलेल्या प्रकारानं आधीच ती महिला/मुलगी धक्क्यात असते. वर आपले शाब्दिक वार. तिच्यासोबतची आपली घृणास्पद वागणूक. एक महिला म्हणून आपण तिचं दु:ख समजून घेतो का? तिला आधार देतो का? ताट मानेन जगण्यासाठी तिच्यासोबत उभं रहातो का? तिच्या शरीरावरच्या जखमा भरतात. पण मनावरच्या जखमा कायम राहतात. तशाच ओल्या, भळभळत्या या जखमांवर फुंकर घालण्याचा विचार आपल्या मनात येईल कधी? हा झाला विनयभंग, बलात्कार पीडित आणि अॅसिड हल्ला पीडितांचा मुद्दा.
एखादी महिला वेश्या व्यवसाय करते किंवा बार डान्सर आहे. हे माहित झालं तर आपण तितक्या सहजतेनं तिच्याशी बोलू, ज्या सहजतेनं तिचं काम माहित होण्यापूर्वी बोलत होतो? (समाजाच्या भीतीपोटीच या महिला आपली ओळख लपवतात) जमेल आपल्याला हे? ती हे का करतेय ते माहित असलं तरी आपण तिला दोषच देऊ. ती हे पोटासाठी करतेय आणि तिलाही ताठ मानेनं जगण्याचा अधिकार आहे हे ठणकावून सांगू का आपण समाजाला ? ती हे काम करते म्हणून तरी निदान काही पुरुषांची शारीरिक भूक शमते आणि काही मुली त्यांच्या अत्याचारापासून वाचतात. हे सांगण्याची होईल का आपली हिम्मत? करु का आपण तिला मोठ्या मनानं मदत ?
रस्त्यानं जाताना कधी एखाद्या महिलेला कुणी मारताना दिसलं आपल्यापैकी कितीजणी तिच्या मदतीला जातील ? तिची चूक असो वा नसो हा मुद्दा नंतरचा पण आधी तिची यातून सुटका महत्त्वाची असते. त्या क्षणाला आपल्या मनात दोनच विचार असु शकतात. जाऊ दे ना ! मला काय करायचंय आणि दुसरा विचार तिचीच चूक असेल, म्हणून मार खाते आहे. इथे मुद्दा कोणाची चूक आहे हा नाही तर नवरा म्हणून बायकोला मारण्याचा अधिकार आहे का त्याला ? जर असेल तर कुठल्या संस्कारांनी आणि समाज व्यवस्थेनं त्याला हा अधिकार दिला? का दिला? बायको म्हणजे यंत्र आहे का? तिला हाडामांसाचा गोळा का समजावं? तिला मन आहे. तिनं काय करावं काय करू नये हे ठरवण्याचा अधिकार इतरांप्रमाणे तिलाही आहे. का घडतं असं? अगदी लहान वयातही मुलं मुलींच दमन करताना का दिसतात? आपणच कारणीभूत आहोत का त्याला? आपण तसे संस्कारच करतो का बालपणापासून? मुलगी म्हणजे कमजोर, कमकुवत, नाजूक हा गैरसमज कायम आहे? मग असं असेल तर कुठल्याही कठीण प्रसंगात, संकटात महिलांचा धीरोदात्तपणा कसा काय दिसतो? मोठमोठ्या दुःखातून स्त्री स्वतःला सावरते आणि यशस्वीपणे उभी राहते. हे किती पुरुष करू शकतात? साधं उदाहरण द्यायचं तर शेतकऱ्याचं घेऊया. शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं ऐकलंय कधी? कर्जाचा डोंगर तिच्या कुटूंबावर असतो, म्हणजे त्याची झळ तिलाच जास्त बसते ना? मग का नाही करत ती आत्महत्या? नवराच का आत्महत्या करताना दिसतो ? (याला अनेकजण आक्षेप घेतील. पण हे माझं निरीक्षण आहे. हे माझं मत आहे.)
एवढंच कशाला गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेलं #metoo यातल्या मुलींच काय झालं? त्यातल्या कितीजणी खऱ्या आणि कितीजणी खोट्या यापेक्षा त्यांच्या आरोपांनंतर त्यांना चुकीचं ठरवणाऱ्या महिलाच जास्त दिसल्या मला. त्यात मीही होतेच. मलासुद्धा एक क्षण अस वाटून गेलं की काम मिळत नसल्यानं हे आरोप करत असतील. पण त्या क्षणाला मीही एक मुलगी म्हणून आधी त्या मुलीच्या भावनांचा विचार करायला हवा होता. नंतर स्वतःचीच घृणा वाटली. जी आजतागायत कायम आहे. असे विचार मी कशी काय करू शकते हा प्रश्न मी आजही स्वतःला विचारते. कितीतरी जणी अशा वादळानं उद्धवस्त होतात. काही धैर्यानं सगळं बोलतात तर काहीजणी निमूट सहन करतात. आतातर आपल्याला यातल्या काही गोष्टींची इतकी सवय झाली की, काही वाटेनासच होतं. हे तर नेहमीचंच असा विचार मनात येतो. कार्यालयातल्या हपापलेल्या नजरा, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वखवखलेल्या नजरा याला आपण आता सवयीच करून टाकलं. का आपण एक जळजळीत कटाक्ष टाकू शकत नाही अशा पुरुषांवर? त्याला त्या क्षणाला खजील वाटावं असं एक वाक्य बोलू शकत नाही?
एखादी लिव्ह इन रिलेशनशिपमधली तुमची मैत्रीण असेल, तर काय भावना असतील तिच्याबद्दल तुमच्या मनात. ती का लिव्ह इनमध्ये राहतेय हे जाणून घ्याल ?मासिक पाळीवरून होणारा विरोध आपण झुगारु शकत नाही. उलट त्यावरूनही महिलांकडे हीन म्हणून पाहिलं जातं. स्वतः डॉक्टर असूनही बायको किंवा मुलीची मासिक पाळी असताना तिच्या हातचं जेवायचं नाही असे विचार घेऊन जगणारा सो कोल्ड पुरुषही मी पाहिलाय. आणि त्याची बायको, मुलगी हे स्वतः निमूट सहन करतात हेही पाहिलय. अशा वेळी त्या पुरुषापेक्षा त्या मायलेकींचीच जास्त कीव वाटायची. (आज तर त्यांच्यावर हसायला येतं कारण जी मुलगी दर महिन्याला या गोष्टी पाळायची ती स्वत: आता डॉक्टर आहे.)
पुरुषाशिवाय महिला समर्थपणे आणि वेळ पडलीच तर त्याच्यापेक्षा उत्तमरितीनं कुटुंबाचा गाडा हाकताना दिसते. हे मी स्वतः अनुभवलंय. (माझ्या घरात नव्हता कुणी पुरुष. माझ्या आईनं एकटीनं कुटुंबाचा गाडा हाकला. अडखळली असेल पण थांबली नाही कधी आणि मला याचा अभिमान आहे.) पण खेदानं एक सांगावच लागेल ती अडखळली ना ते नेहमी स्त्रियांमुळेच. तिच्या कामांमध्ये आजवर आडकाठी आणली ती तिच्या आसपास असलेल्या महिलांनीच. पुन्हा तेच, बोलून बोलून गुळगुळीत झालेलं वाक्य ‘स्त्रीच स्त्रीच्या पतनाला कारणीभूत असते.’ का असं वागतो आपण ? त्यामुळेच का पुरुष गैरफायदा घेतात ?
एखाद्या मुलीची छेड कुणी काढताना दिसलं तर आपण जाऊ का तिच्या मदतीला ? त्या वेळी मनात स्वतःच्या अब्रूसाठीची भीती असते. महिलेची अब्रू काचेच्या भांड्यासारखी आणि पुरुषाची? सोन्यासारखी? सतत चकाकणारी ? का ? बलात्कार झाला विनयभंग झाला की मुलगी गेली कामातून ! तीच शरीर म्हणजेच सारं काही आहे का ? तीच मन महत्वाचं नाही ? याच विचारापोटी मुली महिला सतत शरीराचा विचार करतात. पुरुषी नजरांपासून शरीर सांभाळतात. युगानयुग स्त्री शरीराची भीती बाळगत आली आहे. पुरुषांनी तिला ते सक्तीनं करायला लावलंय का ? का हा अन्याय ? कधी तुटतील ही जोखडं ?
हुंडाबळीसाठी कारणीभूत ठरणारी कोण ? कित्येक केसेसमध्ये सासू जबाबदार. पण सासू कोण ? स्त्री. का असतो तिचा हुंड्यासाठी आग्रह ? मुलानं स्वत:च्या दिमतीवर पैसा कमवावा येवढी ताकद त्याच्या मनगटात नसते ? ती शिकवण ते संस्कार त्या आईनं मुलाला दिलेले नसतात ? हुंडा कमी मिळाला वर सुनेच्या पोटी मुलगी जन्मली तर तिचा अतोनात छळ. कशासाठी ? काही सासवांचं क्रौर्य इतकं की त्या निष्पाप जीवाला गर्भातच संपवतात. आपणच आपल्या वैरी ठरतो. अशा हुंड्यासाठी अडून बसणाऱ्या महिलांना आपणच विरोध करायला हवा. तेव्हाच हुंडाबळी थांबेल. स्त्रीभ्रुणहत्या थांबवण्यासाठीही आपण प्रयत्न करायला हवे. माझ्या पोटी जन्माला येणारं मुलं मी का म्हणून मारावं ? कहर म्हणजे ज्या सोनोग्राफी सेंटरमध्ये छुप्या पद्धतीनं लिंगनिदान केलं जातं तिथे महिलांची संख्याच अधिक असते. सधन आणि शहरी भागात हे प्रकार जास्त चालतात ही मोठी शोकांतिका आहे. इथे जग चंद्रावर, मंगळावर पोहोचलंय. आणि आम्ही मुलीच्या जन्मासाठी सून कारणीभूत असल्याचा समज कुरवाळत बसलोय.
नवऱ्याच्या त्रासातून अजून स्त्री मुक्त नाही. वासनांध पुरुषांच्या नजरेतुन स्त्री अजून मुक्त नाही. तिच्या मनातली शरीराविषयीची भीती अनंत काळापासून तशीच आहे. सगळं अजून तेच आणि तसंच. महिलांच्याबाबतीत समाजाची मानसिकता अजून बदलेली नाही. महिला दिन साजरा करण्याचा हेतूच अजून यशस्वी होत नाहीये. उलट ज्या महिलांना हा दिन साजरा करायचा असतो त्यांनी स्वत:च्या सोयीनं त्या दिवसाचा अर्थ काढलाय. हेच मुळात फार भयंकर आहे.
एक स्त्री असून आपण दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकत नसू, तिच्या अडचणीत तिला मदत करू शकत नसू, तर का आपण हा दिवस साजरा करायचा ? जर आपलीच पावलो पावली परवड होणार असेल, असा जागतिक महिला दिन साजरा करायला सुरूवात करुनही स्त्रीवर अन्याय होतच असेल आणि स्त्री म्हणून आपणही तो सहन करत असू, जागतिक महिला दिन फक्त २ क्षण मौज मजा करण्यासाठी असतो अशी गोड समजूत करुन घेणार असू तर कशाला साजरा करायचा हा दिवस?.
महिला ही मुळातच आशावादी आहे. माझ्या आसपास मला अशाही मुली, महिला दिसतात ज्या समर्थपणे सगळं पेलत आहेत. टुकार नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा स्वतंत्र होतात. पोटच्या पोरांचा योग्य पद्धतीनं सांभाळ करतात. लग्न न करण्याचा निर्णय घेत आई/वडिलांचा आपल्याला आदर्श वाटावा असा सांभाळ करतात. अशा मुलींकडे पाहिलं की वाटतं महिला दिनाचं उद्दिष्ट थोडं का होईना साध्य होतं आहे.
(माझ्या आयुष्यात आजवर आलेल्या तमाम मुली महिलांना हा लेख समर्पित)