'मराठी आणि हिंदी ड्रायव्हर - नोकरांची भाषा आहे का?'

मुंबईतील खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी विषय न शिकवला जाण्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी खंत व्यक्त केलीय. 

Updated: Dec 12, 2017, 11:00 PM IST
'मराठी आणि हिंदी ड्रायव्हर - नोकरांची भाषा आहे का?'  title=

मुंबई : मुंबईतील खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी विषय न शिकवला जाण्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी खंत व्यक्त केलीय. 

महाराष्ट्र राज्यात राहायचे, काम करायचे असेल तर मराठी यायलाच हवी. मराठी भाषेकडे निजी शाळांमध्ये दुर्लक्ष केले जात आहे आणि या शाळेचा एकूण दृष्टिकोन मराठीला घेऊन अनुकूल नाही. मराठी आणि हिंदी भाषा ड्रायव्हर आणि नोकरांची भाषा म्हणून दक्षिण मुंबईच्या लोकांमध्ये ओळखली जाते. शाळेत जाणाऱ्या दोन मुलांची आई या नात्याने, मला जाणवलं की माझ्याच मुलांना ही भाषा शिकण्यास स्वारस्य नाही, असं शायना एन सी यांनी म्हटलंय. 

मुंबईत २००० हून अधिक खाजगी शाळा आणि आंतरराष्ट्रीय शाळा आहेत. आठवी पर्यंत बहुतेक सर्व खाजगी शाळांमध्ये मराठी अनिवार्य आहे. परंतु, काही शाळा मराठी भाषेचा तास इतर विषयांसाठी वापरतात. आठव्या वर्गापासून पुढे मराठी पर्यायी विषय बनला आहे आणि पर्याय म्हणून फ्रेंच किंवा जर्मनची निवड केली जाते. कोणत्याही स्थानिक भाषेची आणि राष्ट्रभाषेची तुलना परदेशी भाषाशी करता येईल का? इथे हेतू कोणत्याही परदेशी भाषेचा निषेध करण्याबाबत किंवा शाळांमध्ये इंग्रजीचा वापर कमी करण्याबद्दल नाही परंतु मुद्दा दोन भाषांचे सह-अस्तित्वाचा आहे. आपल्या भावी पिढीच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी मराठी व हिंदी भाषेचे जतन करणे आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

शायना एनसी निर्मित 'बारायण' हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होतोय. 'चित्रपट माध्यमातून  सामाजिक संदेश देता येतो, 'बारायण' शिक्षण विषयक संदेश देतो त्यामुळे या चित्रपटाशी जोडले गेल्याचा आनंद आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.