Mumbai News : मुंबईमध्ये सध्या नजर जाईल तिथं उंचच उंच इमारती नजरेस पडत आहेत. काही भागांमध्ये डोकावणाऱ्या आणि या शहराच्याच इतिहासाचा एक भाग असणाऱ्या मिलच्या चिमण्या अद्यापही गतकाळाची आवण करून देत आहेत. तर, कुठं उंच इमारतींच्या कुंपणानं वेढलेल्या चाळी, आपल्याला भूतकाळात डोकावण्याची संधी देत आहेत. मुळात मुंबईचा विकास अतिशय झपाट्यानं होण्यासोबतच हे शहर दर दिवशी त्याचा चेहरा बदलताना दिसत आहे. अशा या शहरात हक्काचं घर असणारे अनेक असले तरीही एक मोठा वर्ग या मुंबईपासून दुरावला आहे.
काहींचे या शहरात घर घेण्याचे प्रयत्नही आहेत. पण, गगनचुंबी इमारतींप्रमाणं गगनाला गवसणी घालणारे इथल्या घरांचे दर अनेकांच्या अवाक्याबाहेरचे. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निर्देशांमुळं घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. शहरातील उंच इमारतींमध्ये असणाऱ्या जिन्यांसाठी बिल्डरना मोठी सवलत देण्याचे निर्देश पालिकेच्या नगरविकास खात्यानं दिले आहे.
कोरोना काळातही अशीच सवलत देण्यात आली होती. पण, या सवलतीचा फाया सर्वसामान्य नागरिकांना आणि त्याहूनही घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांना मात्र झाला नाही हे नाकारता येत नाही. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर शहरातील बिल्डरना होणारा हा फायदा अनेकांच्याच भुवया उंचावत आहे.
आतापर्यंत 10 मजली इमारतीत जिन्याच्या अतिरिक्त भागासाठी 8 लाख रुपये आणि 30 मजली इमारतीत 40 लाख रुपये इतकी प्रिमियम रक्कम बिल्डरनं भरणं अपेक्षित होतं. या शुक्लामुळं बांधकाम खर्चातही वाढ होत असल्याचा सूर आळवला जात होता. पण, आता मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या जिन्यासाठी कोणतीही वाढीव रक्कम आकारू नये असे निर्देश पालिकेच्या वतीनं देण्यात आले आहेत. असं असलं तरीही याचा फायदा बिल्डरना होत असून, घर खरेदी करू पाहणाऱ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. किंबहुना येत्या काळात घरांच्या किमती शहरात कमी होतील अशी अपेक्षाही न करण्याचा इशारा या क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.