बुरख्यामुळे ए आर रेहमानवरची मुलगी ट्रोल, टीकाकारांना जोरदार प्रत्यूत्तर

रहमानची मुलगी खतिजा हिचा साडी आणि बुरखा परिधान केलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय

Updated: Feb 8, 2019, 05:05 PM IST
बुरख्यामुळे ए आर रेहमानवरची मुलगी ट्रोल, टीकाकारांना जोरदार प्रत्यूत्तर

मुंबई : ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए आर रेहमानवर सोशल मीडियातून जोरदार टीका सुरू आहे. रेहमानच्या छोट्या मुलीनं - खतीजा हीनं बुरखा परिधान केल्यानं तिच्यावर आणि रेहमानवर सोशल मीडियातून टीका सुरू होती. यावर रेहमाननं जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. 'खतिजाला आपला पोशाख निवडण्याचा अधिकार आहे' असं रेहमाननं म्हटलंय.

रहमानची मुलगी खतिजा हिचा साडी आणि बुरखा परिधान केलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. दोन ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित ए आर रेहमानच्या 'स्लमडॉग मिलेनिअर'च्या संगीताला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ती एका कार्यक्रमाला उपस्थित झाली होती. यावेळी, ५१ वर्षीय रेहमाननं आपल्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या स्त्रियांचा फोटो सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. या फोटोत रेहमानची पत्नी सायर, मोठी मुलगी रहीमा यांनी बुरखा परिधान केलेला नाही. परंतु, छोटी मुलगी खतीजा हिनं मात्र आपला चेहरा बुरख्यात झाकलेला दिसतोय.

याबद्दल खतीजानंही आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केलंय. 'मी जे कपडे परिधान करते किंवा माझ्या आयुष्यात जे निर्णय घेते, त्यांचा माझ्या आई-वडिलांशी काहीही संबंध नाही. बुरका परिधान करणं हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मी सज्ञान आहे आणि मला माझ्या आयुष्याचे निर्णय घेता येतात' असं सडेतोड उत्तर तिनं टीकाकारांना दिलंय.

या फोटोमध्ये या तिघी नीता अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर झळकल्यानंतर त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या तर अनेकांनी या फोटोला 'लाईक'ही केलं होतं.