'त्या वुहानमध्ये कोणीतरी वटवाघूळ खायलाय....'; संकर्षण कऱ्हाडे म्हणतोय कोरोनाची कविता

एकदा हा व्हिडिओ पाहाच.... 

Updated: May 18, 2020, 01:41 PM IST
'त्या वुहानमध्ये कोणीतरी वटवाघूळ खायलाय....'; संकर्षण कऱ्हाडे म्हणतोय कोरोनाची कविता  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून Coronavirus  कोरोना विषाणूने सर्वत्र घातलेलं थैमान सर्वांच्याच मनावर असे काही परिणाम करुन गेलं आहे, जे पाहता प्रत्येकालाच आता हा सारा काळा आव्हानात्मक वाटू लागला आहे. सुरुवातीला लॉकडाऊनची सवय झाली असं म्हणणारे अनेकजण आता मात्र काहीसे तणाव आणि नैराश्याचा सामना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच या वातावरणात आधार आहे, तो म्हणजे सोशल मीडियाचा. 

बहुतांश व्यवहार ठप्प असले, तरीही सोशल मीडियावर हाताशी असणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेण्याकडे नेटकऱ्यांचा कल दिसत आहे. सेलिब्रिटी मंडळी यात मागे नाहीत. अशा या सेलिब्रिटींपैकीच एक असणाऱ्या अभिनेत्री, सुत्रसंचालिका, कवितांवर खूप सारं प्रेम करणाऱ्या स्पृहा जोशी हिने काही दिवसांपासून लाईव्ह सेशन सुरु केले आहेत. 'खजिना आठवणीतल्या साठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काही', अशा लाईव्ह सेशनदरम्यान ती विविध सेलिब्रिटींशी पुस्तकं, लेखन, लेखन साहित्य अशा कैक विषयांवर दिलखुलास गप्पा मारते. 

सपृहाशी गप्पा मारत असताना अशाच ओघात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हासुद्धा काही दिवसांपूर्वी सहभागी झाला होता. संकर्षण कऱ्हाडे हे नाव प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. आम्ही सारे खवय्येपासून ते अगदी त्याच्या सुरेख अशा व्यक्तीमत्त्वापर्यंत सर्वच बाबतीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्यानं स्पृहाशी गप्पा मारत असताना एक अनोखी कविता सादर केली. 

वाचा : दिलासादायक : युरोपातील 'हा' देश कोरोना मुक्त

आपल्या परभणीच्या मित्राचा फोन आला, तेव्हा सहाजिकच कोरोनाबाबतही चर्चा झाली. अशातच स्थानिक भाषेत तो मित्र 'शंक्या काहीही व्हायलंय बे हे ....', असं म्हणून गेला. मित्राच्या याच शब्दांनी संकर्षणला चक्क ही कविता सुचली आणि त्याने ती सपृहाशी गप्पा मारताना सादर केली. 

मराठवाडा पट्ट्यातील भाषेचा गोडवा असणारी ही कविता आणि ती सादर करणारा संकर्षण सपृहाने जोशी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.  'त्या वुहानमध्ये कोणीतरी वटवाघूळ खायलाय...., प्रत्येकाचा कोरोना वेगळाच निघायलाय.... ट्रम्प म्हणतंय तो चीन मुद्दाम करायलाय.....', अशी शब्दांची गुंफण करत करत त्यानं मद्यविक्रीच्या बाहेर लागलेल्या रांगांवरही मार्मिक टीका केली. 

'दारुडा खरा देशभक्त निघालाय.... 
कालपर्यंत ज्याच्यावर गल्ली थुकायची
तोच अर्थव्यवस्थेचा कणा व्हायलाय....', असं लिहित देशाची परिस्थिती खरंच किती गंभीर आहे हे कवितेच्या अखेरीस त्यानं अतिशय समर्पकपणे सर्वांसमोर ठेवलं आहे.