'केशरी रंगात रंगवू इच्छिणाऱ्यांच्या जाळ्यात मी फसणार नाही'

सुपरस्टार रजनीकांत यांचं सुचक विधान 

Updated: Nov 9, 2019, 09:43 AM IST
'केशरी रंगात रंगवू इच्छिणाऱ्यांच्या जाळ्यात मी फसणार नाही' title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनय विश्वात नावारुपास आल्यानंतर राजकीय क्षेत्रात नवी इनिंग सुरु करणाऱ्या सुपरस्टार रजनीरकांत यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आपल्याला केशरी रंगात रंगवण्याचा कट असल्याचं म्हणत आपण अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या जाळ्यात अडकणार नाही, असं सूचक विधान रजनीकांत यांनी केलं आहे. 

चेन्नईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. तामिळ कवी तिरुवल्लूवर यांच्यासोबतही असंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण, सत्य हेच आहे की तिरुवल्लूवर त्यांच्या जाळात फसले नाहीत आणि मीसुद्धा फसणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून आपण तामिळनाडूमध्ये भाजपचा चेहरा असल्याचं भासवण्यात येत असल्याचं म्हणत त्यांचा हा मनसुबा यशस्वी होणार नसल्याचं रजनीकांत यांनी ठामपणे सांगितलं. सध्याच्या घडीला तामिळनाडूला एका कर्तृत्तववान नेत्याची गरज असल्याचं म्हणत ही जागा लवकरच भरुन निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकॉक दौऱ्यादरम्यान, तामिळ कवी तिरुवल्लूवर यांच्यावर आधारित एका पुस्तकाचं अनावरण केलं. ज्यानंतर एक ट्विट करण्यात आलं होतं, ज्यामधील फोटोत एक कवी केशरी रंगाच्या वस्त्रांमध्ये दिसले होते. ज्यानंतर भाजप आणि स्टॅलिनच्या नेतृत्त्वातील डीएमकेमध्ये वादाची ठिणगी पडली. 

रजनीकांत की पार्टी से पहले आ सकता है उनके नाम और तस्वीर के ‘लोगो’ वाला टीवी चैनल

केशरीकरणाच्या या वादामध्ये शुक्रवारी सुपरस्टार रजनीकांत यांनीही उडी घेतली. सोबतच तिरुवल्लूवर मुद्द्याला अवाजवी चुकीच्या मार्गांनी महत्त्व दिलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नको त्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी सर्वसामान्य व्यक्तींच्या समस्या आणि इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 

राजकारणातील कारकिर्दीविषयी बोलताना त्यांनी आपण, अभिनयही सुरुच ठेवणार असल्याच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. 'मी कोणत्याही पक्षात सहभागी होईन. त्यात वावगं काहीच नाही. पण, मला कोणावरही अवलंबून रहायचं नाही आहे. माझ्या राजकीय क्षेत्राविषयी निर्णय हा सर्वस्वी माझा असेल. एमजीआरसुद्धा तोपर्यंत अभिनय करतच राहिले होते, जोपर्यंत त्यांचा पक्ष राजकीय वर्तुळात विजयी ठरला नाही आणि जोपर्यंत मुख्यमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आलं नाही', असं रजनीकांत म्हणाले. 
आगामी चित्रपटांविषयी सांगायचं झाल्यास रजनीकांत 'दरबार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पुढच्या वर्षी पोंगलच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये रजनीकांत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.