'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

Shriya Pilgaonkar :  श्रिया पिळगांवकर ही अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे. श्रिया मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही या चर्चांवर अखेर श्रियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 3, 2023, 03:29 PM IST
'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य title=
(Photo Credit : Social Media)

Shriya Pilgaonkar : अनेक स्टार किड्स आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पावलं ठेवतं अभिनय क्षेत्राकडे वळतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रिया पिळगांवकर. श्रिया पिळगांवकरनं आजवर अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. श्रियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त काम केलं आहे. दरम्यान, श्रियानं मराठी अभिनय क्षेत्रात का इतकं काम केलं नाही असं नेहमीच तिला विचारण्यात येतं. यावर आता श्रियानं मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. 

श्रियानं नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामुलाखतीत श्रियानं तिचं करिअर आणि घराणेशाहीवर वक्तव्य केलं. श्रियानं तिचे वडील सचिन पिळगांवकर यांच्यासोबत एकुलती एक या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर श्रिया कोणत्याही मराठी चित्रपटात दिसली नाही. मग काय श्रिया हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्ये दिसू लागली. श्रियाला हिंदी चित्रपटसृष्टीत पाहत असताना अनेकां समोर प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता श्रियानं तिचं मराठीत काम न करण्यावर वक्तव्य केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रिया या मुलाखतीत तिला मराठीत काम करायचं नाही असे अनेकांचे विचार असण्यावर म्हणाली, अनेकांना गैरसमज आहे की मला मराठी चित्रपटसृष्टीत काम करायची इच्छा नव्हती. खरंतर एकुलती एक हा चित्रपट एका स्टारकिडला लॉन्च करणाऱ्या पठडीतला नव्हता. त्यानंतर मी लगेच फॅन चित्रपटात दिसले. ते पाहता अनेकांनी मला हिंदीचा टच असेल अशा चित्रपटाच्या ऑफर दिल्या. या कारणामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : सलमानच्या सावत्र आईनं केलेला कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न? अरबाज खानचं वक्तव्य चर्चेत

पुढे फॅन चित्रपटानंतरच्या कामाविषयी बोलताना श्रिया म्हणाली, फॅन चित्रपटानंतर मला दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण त्यापैकी एका चित्रपटाचे दिग्दर्शक बदलले आणि एका चित्रपटाचं काही झालं नाही. यामुळे मी मराठी चित्रपटात दिसले नाही. 

नाटकातील अभिनय पाहूनी मिळाली होती पहिली ऑफर

श्रियानं 'फ्रीडम टू लव्ह' या नाटकासाठी अभिनय केला होता. तिच्या तालमीला एकदा तिचे आई-वडील पोहोचले होते. तिचा अभिनय पाहता तिचे वडील म्हणजेच सचिन पिळगांवकर यांनी तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. याविषयी सांगत असताना श्रिया म्हणाली की 'बाबा म्हणाले की मला तुझं काम आवडलंय. मी सध्या वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या कथानकावर काम करतोय. त्यात तू काम करावंस अशी माझी अपेक्षा आहे. पण, जर मी तो चित्रपट केला तर माझ्याविषयी चर्चा सुरु होतील हे मला माहित होतं. त्यानंतर पप्पांनी माझी समजूत काढली की मी काहीही केलं तरी लोक बोलणारचं आहेत.' 

पुढे श्रिया म्हणाली की 'बॉलिवूडमध्ये 'मेकिंग ऑफ स्टार'चा हा एक वेगळा व्यवसाय चालतो. यात तुमचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तुम्हाला स्टार केलं जातं. पण, मी माझा प्रवास हळू हळू एका एका टप्यानं केला आहे. मी आई-वडिलांच्या ओळखीचा कधीच फायदा घेतला नाही किंवा, घराणेशाहीचं कार्ड वापरलं नाही.'