रानू मंडलमागोमाग पहाडी आवाजाची 'ही' मुलगी वेधतेय सर्वांचं लक्ष

पाहा तिचा हा व्हि़डिओ....   

Updated: Sep 20, 2019, 03:21 PM IST
रानू मंडलमागोमाग पहाडी आवाजाची 'ही' मुलगी वेधतेय सर्वांचं लक्ष   title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील एका रेल्वे स्थानकावर 'इक प्यार का नगमा है', हे गाणं अतिशय सुमधूर आवाजात गाणाऱ्या रानू मंडल यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. मुळात रानू यांच्या आवाजानेच खऱ्या अर्थाने सर्वांना भुरळ घातली होती. तिसुद्धा अशी की, थेट बॉलिवूडमधूनच त्यांची दखल घेण्यात आली. 

रातोराज प्रसिद्धीझोतात आलेल्या रानू मंडल यांना कलाविश्वात त्यांची कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यांच्यामागोमाग अशाच काहीजणांचे व्हि़डिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. कोणी भाजी विकणारा, कारचालक वगैरे वगैरे व्यक्ती अनेकांचं लक्ष वेधू लागले. 

सध्याच्या घडीलासुद्धा सोशल मीडियावर असाच एक व्हि़डिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ अशा एका मुलीचा जिचा आवाज ऐकून, तुम्हीही म्हणाल क्या बात...! एका लोककला सादर करणाऱ्या समूहातील ही मुलगी या व्हिडिओमध्ये, 'झिंदगी है तेरे नाल' हे गाणं गाताना दिसत आहे. गाणं गाताना तिने घेतेल्या हरकती आणि त्या हरकती सादर करताना तिच्या चेहऱ्यावर असणारे अद्वितीय भाव या व्हि़डिओमध्ये पाहायला मिळत आहेत. युट्यूबवर एका युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

व्हिडिओमध्ये गाणारी पहाडी आवाजाची ती मुलगी कोण, तिचं नाव काय किंवा ती मुळची कुठली आहे याविषयीची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण, एकंदरच सोशल मीडियाचं पसरलेलं विस्तीर्ण जाळं पाहता, तिच्याविषयीची माहिती लवकरच समोर येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. असं झाल्यास आणखी एका कलाकाराला साऱ्या जगासमोर कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळेल हे खरं.