Ajay Devgan Upcoming: बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण बऱ्याच दिवसांच्या ब्रेकनंतर सिनेसृष्टीत दमदार कमबॅक करत आहे. अमित शर्मा दिग्दर्शित 'मैदान' या सिनेमातून अजय त्याच्या चाहत्यांना नव्या भूमिकेत दिसणार असतानाच, हा सिनेमा वादाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची माहिती समोर आली आहे. 'मैदान' या सिनेमातून अजय मोठ्या ब्रेकनंतर चाहत्यांचा भेटीस येत होता, मात्र रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे.
काय आहे प्रकरण ?
अजय देवगणचा नवा सिनेमा 'मैदान' हा सत्य घटनेवर आधारित असून एका फुटबॉल खेळाडूची गोष्ट आहे. या सिनेमाची कथा चोरली असल्याचा आरोप कर्नाटकचे लेखक अनिल कुमार यांनी केला. अनिल कुमार यांच्या म्हणण्यानुसार अमित शर्मा दिग्दर्शित 'मैदान' सिनेमाच्या स्क्रिप्टची चोरी करण्यात आली आहे. फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावरील ही कथा मी 2010 मध्ये लिहायला सुरुवात केली. 2018 मध्ये यासंदर्भातील पोस्टर मी सोशलमीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर या संदर्भात मी, लिंक्डइनवरुन दिग्दर्शक सुखदास सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी मला मुंबईला येऊन आमीर खानची भेट घेण्याचं सुचवलं होतं. मात्र काही कारणाने माझी आणि आमीरची भेट होऊ शकली नाही. असं असलं तरी मी माझी कथा स्क्रीन रायटर्स एसोसिएशनमध्ये रजिस्टर केली होती. त्यानंतर अचानक 'मैदान' नावाचा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे असं कळालं. या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर मला धक्का बसला. पुढे ते असंही म्हणतात की, मी लिहिलेली कथा आणि मैदान सिनेमाची स्क्रिप्ट सारखीच आहे.
कोर्टाचा आदेश
साहित्य चोरीच्या या आरोपांचं प्रकरण आता म्हैसूर कोर्टात गेलं आहे. हा सिनेमा 11 एप्रिलला ईदच्या दिवशी रिलीज होणार होता, पण करण्यात आलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे कोर्टाने सिनेमाच्या रिलीजवर बंदी घातली आहे. या प्रकरणासंबंधीत पुराव्यांची योग्य पडताळणी करुनच निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका म्हैसूर कोर्टाने मांडली आहे. या सिनेमात भारताचे माजी फुडबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम यांची भुमिका अजय देवगणने साकारली असून 1952 ते 1962 च्या काळातील ही कथा असल्याचं सांगितलं जातं. सिनेमाचं दिग्दर्शन अमित शर्माने केलं असून बोनी कपूर निर्माता आहेत.