पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा मदतीचा हाथ

केली इतकी मदत...

Updated: Aug 18, 2020, 03:15 PM IST
पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा मदतीचा हाथ title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा संकट काळात मदतीसाठी पुढे आला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंगळवारी एक ट्विट याबाबत करत माहिती दिली आहे. अक्षय कुमारने आसाम पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत केली आहे. सोनोवाल यांनी ट्विट करत अक्षयचे आभार मानले आहेत.

सध्या आमिर खान वादात असताना, सुशांत आत्महत्येनंतर बॉलिवूड निशाण्यावर असताना अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केवळ आसामचं नाही तर अक्षयने बिहार पूरग्रस्तांसाठीही 1 कोटी रुपये दिल्याची माहिती आहे. मात्र अक्षयने याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

अक्षयने यापूर्वीही अनेकदा संकट काळात अशाप्रकारे मदत केली आहे. अक्षयने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली होती, त्यावेळी मुंबई पोलीस फाऊंडेशनसाठी 2 कोटी आणि बीएमसीसाठी 3 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. गेल्या वर्षी मे महिन्यातही अक्षयने ओडिशा सरकारला फानी चक्रीवादळावेळी 1 कोटींची मदत केली होती. 

दरम्यान, आसाममध्ये पुरामुळे लोकांचं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. सिंगरा नदीची पाणी पातळी वाढल्याने अनेक लोक डुबल्याची माहिती आहे. आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला तर भूस्खलनामध्ये 26 जण दगावले. तीन पूरग्रस्त जिल्ह्यात 28 गाव आणि 1535 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.