अक्षयच्या 'त्या' डायलॉगमुळे धार्मिक भावना दुखावल्या, नेटकऱ्यांकडून ट्रोल

काय म्हणाला अक्षय?

Updated: Dec 24, 2019, 07:47 PM IST
अक्षयच्या 'त्या' डायलॉगमुळे धार्मिक भावना दुखावल्या, नेटकऱ्यांकडून ट्रोल

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'गुडन्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे दोन ट्रेलर चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. ऐकीकडे चित्रपटाच्या दोन्ही ट्रेलरला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. तर दुसरीकडे अक्षयने चाहत्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

'गुडन्यूज' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असलेल्या एका डायलॉगमुळे अक्षय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या ट्रेलरमधील वादग्रस्त भागाचा एका व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका व्यक्तीसोबत बोलत आहे. तो व्यक्ती त्याच्या मुलाचे नाव रामाच्या नावावरून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. 

पण देवाच्या नावावर एक विनोद केल्यामुळे त्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याच्या या डायलॉगवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

एका युजरने हा विवादित व्हिडिओ शेअर करत अक्षयला परदेशी म्हणून घोषित केले. 'एक परदेशी जो आमच्या देशात राहतो, पैसे आणि प्रसिद्धी कमवतो तोच आमच्या देवाबद्दल अपशब्द वापरतो.' अशा प्रकारे भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे आम्ही तुला माफ करणार नसल्याचे नेटकरी म्हणत आहेत. 

'गुडन्यूज' चित्रपटात अक्षय मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर खान, किआरा आडवाणी आणि अभिनेता दिलजीत दोसांज देखील झळकणार आहे. 'गुडन्यूज' चित्रपट २७ डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.