नाना पाटेकरसोबत अक्षयचं शुटिंग, दुसरीकडे ट्विंकलचा तनुश्रीला पाठिंबा

 तनुश्री दत्ता हिने केलेल्या असभ्य वर्तनाच्या आरोपांचं अभिनेते नाना पाटेकरांनी खंडन केलं

Updated: Sep 28, 2018, 01:14 PM IST
नाना पाटेकरसोबत अक्षयचं शुटिंग, दुसरीकडे ट्विंकलचा तनुश्रीला पाठिंबा

मुंबई : दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तनुश्री दत्तानं दिग्गज अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकरवर 2008 सालू 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शोषणाचा आरोप केला होता. नुकत्याच एका मुलाखतीत तीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करत 'जर अक्षय कुमार आणि रजनीकांतसारखे मोठे अभिनेतेही त्याच्यासोबत काम करतात तर मग इथं बदलाची काय अपेक्षा ठेवता येईल?' असा प्रश्नही तनुश्रीनं उपस्थित केला होता. सध्या, एकीकडे अक्षय कुमार आपल्या नव्या सिनेमासाठी 'हाऊसफुल 4'साठी नाना पाटेकरसोबत करण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना तनुश्रीला पाठिंबा देत पुढे आलीय. 

10 वर्षांपूर्वी तनुश्रीला इंडस्ट्रीतून कोणताही पाठिंबा मिलाला नव्हता. परंतु, तनुश्रीच्या नुकत्याच झालेल्या वादग्रस्त मुलाखतीनंतर अनेक जण तिचं सोशल मीडियातून समर्थन करताना दिसत आहेत. तर अनेक जण विरोधही करत आहेत.

याच दरम्यान एका महिला पत्रकारानं त्यावेळी आपण सेटवर उपस्थित असल्याचं सांगत तनुश्रीचा शब्द आणि शब्द खरा असल्याचं म्हटलंय. यानंतर तनुश्रीला किती मोठा धक्का बसला होता, याबद्दलही तिनं @janiceseq85 या ट्विटर हॅन्डलवरून अनेक ट्विट केलेत. 

 

tanushree dutta

 

याचाच आधार घेत आता ट्विंकलनंही सोशल मीडियावर तनुश्रीचं समर्थन केलंय. 'तनुश्री दत्तावर कोणतीही टीका करण्यापूर्वी कृपया ही ट्वीट सीरिज वाचा. शोषणमुक्त वातावरणात काम करण्याचा प्रत्येक महिलेला अधिकार आहे आणि पुढे येऊन याबद्दल बोलणाऱ्या या धाडसी मुलीनं उचललेलं पाऊल आपल्या सर्वांच्याच कामी येणारं आहे' असं ट्विंकलनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या असभ्य वर्तनाच्या आरोपांचं अभिनेते नाना पाटेकरांनी खंडन केलं आहे. ‘टाईम्स नाऊ’शी संवाद साधताना नानांनी याविषयी आपली प्रतिक्रिया देत तनुश्रीविरोधात कायदेशीर पावलं उचलण्याचा इशाराही दिला आहे. त्यासोबतच त्यांनी चित्रीकरणादरम्यान त्यावेळी सेटवर असणाऱ्या युनिटकडून यासाठी मदत घेणार असल्याचंही सांगितलं.