Pro Kabaddi League: पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी केली दमदार कामगिरी, बंगाल वॉरियर्सवर मिळवला एकतर्फी विजय

चढाईपटूंनी मिळविलेले यश आणि त्यांना बचावफळीकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर प्रो कबड्डी लीगच्या ७३व्या सामन्यात रविवारी पुणेरी पलटणने चार सामन्यानंतर पुन्हा एकदा विजयाचा मार्ग शोधताना बंगाल वॉरियर्सचा ५१-३४ असा १७ गुणांनी धुव्वा उडवला. आकाश शिंदे, मोहित गोयत, पंकज मोहिते या चढाईपटूंबरोबरच मोहितच्या बचावामुनळे पलटणचा हा विजय सुकर झाला. या विजयाने पुणेरी पलटणने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 25, 2024, 10:22 AM IST
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी केली दमदार कामगिरी, बंगाल वॉरियर्सवर मिळवला एकतर्फी विजय title=

PKL 11: चढाईपटूंनी मिळविलेले यश आणि त्यांना बचावफळीकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर प्रो कबड्डी लीगच्या ७३व्या सामन्यात रविवारी पुणेरी पलटणने चार सामन्यानंतर पुन्हा एकदा विजयाचा मार्ग शोधताना बंगाल वॉरियर्सचा ५१-३४ असा १७ गुणांनी धुव्वा उडवला. आकाश शिंदे, मोहित गोयत, पंकज मोहिते या चढाईपटूंबरोबरच मोहितच्या बचावामुनळे पलटणचा हा विजय सुकर झाला. या विजयाने पुणेरी पलटणने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. 

चार सामन्यानंतर पुणेरी पलटणचा विजय 

दोन पराभव आणि दोन बरोबरी अशा चार सामन्यानंतर पुणेरी पलटण संघाने आज दुबळ्या बंगाल वॉरियर्सवर एकतर्फी वर्चस्व राखत विजयाचा मार्ग शोधला. दोन सामन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या मोहित गोयत आणि आकाश शिंदेने प्रत्येकी ९ गुणांची कमाई केली. पंकज मोहितने देखिल ६ गुण मिळवले. सुपर टेनची काळजी न करता पलटणने आपल्या चढाईपटूंना अखेरच्या क्षणी बदलून दुसऱ्या फळीला संधी दिली. कोपरारक्षक मोहितने मात्र हाय फाईव्ह करत आपली छाप पाडली. तुलनेने बंगालकडून १३ गुणांची कमाई करणाऱ्या नितीन धनकरला एकाही खेळाडूची साथ मिळाली नाही. चढाईतील दोनशे गुणांचा टप्पा नितीनने ओलांडला. पण, त्याला संघाला यश मिळवून देता आले नाही. पलटणने चढाईत २९ , तर पकडीमध्ये ११ गुणांची कमाई केली. बंगालने चढाईत २५ गुणांची कमाई केली. त्यातील १३ गुण एकट्या नितीन कुमारचे होते. 

 

'असा' रंगला सामन्याचा उत्तरार्धात

सामन्याच्या उत्तरार्धात अगदी अखेरच्या क्षणी बंगाल वॉरियर्सने आपली आक्रमकता दाखवली. पण, तोवर खूप उशीर झाला होता. अखेरच्या क्षणात नितीन कुमारच्या चढायांनी बंगालने पुणेरी पलटणवर लोण चढविण्यात यशस्वी ठरले. पण, त्यापूर्वी या सत्रातही त्यांना आणखी दोन लोण स्विकारावे लागले होते. पुणेरी पलटणचे सर्व चढाईपटू यशस्वी ठरले. तुलनेत या सत्रातही दडपणाखाली बंगाल तिसऱ्या चढाईच्या चक्रात ओढले गेले. बचावपटूंना आपली योग्यता दाखवता आली नाही. त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या पलटणच्या आर्यवर्धन नवलेने देखिल चार गुणांची कमाई केली. उत्तरार्धाच्या अखेरच्या दहा मिनिटांत बंगालने १६-१३ अशी बाजी मारली होती. पण, तोपर्यंत पुणेरी पलटण संघाने गुणांचे अर्धशतक गाठून आपला विजय निश्चित केला होता. अखेरच्या वेळात राखीव खेळाडूंना अजमावून पलटणने सहजपणे विजयावर शिक्कामोर्तब केले. 

 

बंगाल वॉरियर्सचा विस्कळीत खेळ

पूर्वार्धात पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सच्या विस्कळीत खेळाचा पूर्ण फायदा उठवताना सामन्यावर एकतर्फी वर्चस्व राखले. मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा पुणेरी पलटण संघाने २४-११ अशी १३ गुणांची मोठी आघाडी मिळवली होती. आकाश शिंदे, पंकज मोहिते, मोहित गोयत या चढाईपटूंचा अचूक खेळ पलटणसाठी निर्णायक ठरला. दुसरीकडे बचावपटूंच्या घाईमुळे बंगाल वॉरियर्स सातत्याने अडचणीत सापडले. चढाईपटूंना लय मिळवताच आली नाही. चढाईमध्ये सावधपणा आणण्याच्या नादात बंगाल वॉरियर्सचे चढाईपटू नकळत तिसऱ्या चढाईत अडकले. पहिल्या चढाईत नितीन धनकरने दोन गुण मिळवत चांगली सुरुवात केली होती. यानंतरही नितीन आपल्या खेळात सातत्य राखू शकला नाही. त्यामुळे पूर्वार्धात बंगालला दोन लोण स्विकारावे लागले होते.