घराणेशाहीचा फायदा माझ्या मुलांना देणार नाही - अक्षय कुमार

अक्षय कुमारचा मुलांना इशारा..  

Updated: Jul 1, 2020, 04:19 PM IST
घराणेशाहीचा फायदा माझ्या मुलांना देणार नाही - अक्षय कुमार

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूते १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याचा सामना करत होता. असं असतानाच घराणेशाहीमुळं त्याच्या कारकिर्दीत एक अनपेक्षित टप्पा आल्याचंही बोललं गेलं. घराणेशाहीमुळे स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. शिवाय सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर देखील सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. 

दरम्यान अभिनेता अक्षय कुमार याने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. घराणेशाहीचा फायदा माझ्या मुलांना देणार नाही, असं त्याने सांगितले आहे. त्यांना त्यांच्या कष्टाने आणि जिद्दीने यश संपादन करावं लागेल असं देखील तो म्हणाला. 

एका मुलाखतीत त्याने घराणेशाहीला विरोध दर्शवला आहे. 'प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला काम देण्यापासून थांबवू शकत नाहीत. परंतु मेहनत केल्याशिवाय कोणतेही यश दिर्घकाळ टिकू शकत नाही.' असं अक्षय म्हणाला. 

स्वतःच्या मुलांबाबत सांगताना तो म्हणाला की, 'माझ्या स्टारडमचा फायदा माझ्या मुलांना होवू देणार नाही. आरव आणि नितारा या माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत. कलाविश्वात काम करायचं असेल तर त्यांनी ऑडिशन द्यावी आणि पुढे जावं.' अशा स्पष्ट शब्दात त्याने त्याच्या मुलांना इशारा दिला आहे.