Anant Ambani And Radhika Merchant PreWedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा प्री- वेडिंग सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या भव्य सोहळ्याचे आयोजन गुजरातमधील जामनगरमध्ये करण्यात आले होते. अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा प्री- वेडिंग सोहळा तीन दिवस चालला. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूडसह जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता या सोहळ्यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे.
अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी तब्बल 2 हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते. या पाहुण्यांच्या यादीत फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांचाही समावेश होता. अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंगसाठी आलेल्या मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. पण यावेळी मार्क झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅन यांची एक मौल्यवान वस्तू हरवल्याची घटना घडली आहे.
मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी कॉकटेल पार्टीवेळी मॅचिंग सूट परिधान केला होता. यावेळी मार्क झुकरबर्ग यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर प्रिसिला यांनी त्याच रंगाचा लाँग वनपीस परिधान केला होता. तसेच दुसऱ्या दिवशी प्रिसिला चॅन यांनी लेहंगा परिधान केला होता. तर झुकरबर्ग यांनी सदरा लेहंगा असा लूक केला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला यांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यात झुकरबर्ग यांनी शेरवानी परिधान केली होती. तर प्रिसिला यांनी निळ्या रंगाची फुलांची बॉर्डर असलेली साडी परिधान केली होती. यासोबतच त्यांनी डायमंड नेकलेस आणि इअरिंग्सही परिधान केले होते.
बॉलिवूड शादी या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंगसाठी जामनगर इथे आलेल्या मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांची एक महत्त्वाची वस्तू हरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबानींच्या प्री वेडिंगच्या दुसऱ्या दिवशी झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅन यांचे मौल्यवान डायमंडचे पेडेंट हरवले. यामुळे संपूर्ण पार्टीत एकच गोंधळ उडाला.
प्रिसिला यांच्यासाठी हे पेडेंट खूपच खास होते. त्यांचे पेडेंट हरवल्याची माहिती मिळताच त्याची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. जवळपास साडेतीन तासांहून अधिक काळ या डायमंड पेडेंटची शोधाशोध करण्यात आली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पण या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.