शुभमंगल सावधान! अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सलग तीन दिवस असणार आहे. अनंतच्या लग्नाची पत्रिका लाल रंगाची असून त्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं लिहिण्यात आली आहेत.

नम्रता पाटील | Updated: May 30, 2024, 03:50 PM IST
शुभमंगल सावधान! अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर title=

Anant Ambani Radhika Merchant Wedding Card : गेल्या काही महिन्यांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगनंतर आता ते दोघेही जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची तारीख आणि लग्नाची पत्रिका समोर आली आहे. अनंत-राधिकाचा लग्नसोहळा तीन दिवस असणार आहे.

12 जुलैपासून 14 जुलैपर्यंत रंगणार सोहळा

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतचे लग्न येत्या 12 जुलै रोजी पार पडणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सलग तीन दिवस असणार आहे. अनंतच्या लग्नाची पत्रिका लाल रंगाची असून त्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं लिहिण्यात आली आहेत. या लग्नपत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा 12 जुलैपासून 14 जुलैपर्यंत असणार आहे. यात 12 जुलैला ते विवाहबंधनात अडकतील. त्यानंतर 13 जुलैला आशीर्वाद सोहळा असेल. त्यानंतर 14 जुलै रोजी रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. 

पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार विवाह

या तिन्हीही सोहळ्यांना विशेष ड्रेस कोडही ठरवण्यात आला आहे. यानुसार पहिल्या दिवशी उपस्थित पाहुण्यांनी ट्रेडिशनल ड्रेसकोड परिधान करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंडियन फॉर्मल ड्रेस कोड आणि रिसेप्शनसाठी चिक ड्रेस कोड परिधान करायचा आहे. अनंत अंबानी आणि राधिका यांचा विवाहसोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. त्यांचा हा विवाहसोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहेत. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडपासून ते परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या लग्नपत्रिकेत ईशा अंबानी, अनंत पिरामल, आकाश अंबानी, श्लोका मेहता-अंबानी यांचीही नावं पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच यात पृथ्वी, अदियाशक्ती, कृष्णा, वेदा या अंबानी कुटुंबातील बच्चे कंपनीच्या नावांचाही समावेश आहे.

इटलीत क्रूझमध्ये सुरु आहे दुसरे प्री-वेडिंग

दरम्यान, सध्या अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी इटलीमध्ये क्रुझ बूक करण्यात आली आहे. यासाठी बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत. हे सेलिब्रेशन ३ दिवस होणार आहे. ही क्रूझ इटली ते फ्रान्स असा प्रवास करणार आहे. याआधी मार्च २०२४ मध्ये या जोडप्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे भव्य प्री-वेडिंग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्री-वेडिंगला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली होती.