वाढदिवसाच्याच दिवशी कॉमेडियनच्या मुलाचं निधन

भावूक पोस्ट लिहीत दिली याबाबतची माहिती   

Updated: Nov 9, 2020, 02:01 PM IST
वाढदिवसाच्याच दिवशी कॉमेडियनच्या मुलाचं निधन
प्रतिकात्मक छाया

मुंबई  : जीवनात कोणत्याही गोष्टीची शाश्वती देता येत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. पण, कित्येकदा मजामस्करीत वाटणारी ही बाब कोणा एका वळणावर असा धक्का देऊन जाते की जीवनाची घडीच विस्कटली जाते. सध्या प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीराला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट होत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक पोस्ट लिहित याबाबतची माहिती देणारा हा विनोदवीर आहे राजीव निगम. आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी मुलगा देवराज याचं निधन झाल्यामुळं नियतीनं दिलेला हा धक्का काही राजीवला पचवता आलेला नाही. 

अखेर त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहित भावनांना वाट मोकळी करुन दिली. 'हे असं गिफ्ट कोणी देतं का रे वेड्या.....', असं लिहित त्यानं आपलं दु:ख व्यक्त केलं. मुलासोबतचा एक फोटोही त्यानं यावेळी पोस्ट केला. जो पाहिल्यानंतर नेटकरीसुद्धा हळहळले. 

 

सूत्रांच्या माहितीनुसार त्याचा मुलगा मागील जवळसा दोन वर्षांपासून आजारी होता. त्यादरम्यानच कामावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर अखेर राजीवनं कुटुंबाला प्राधान्य देत करिअरला दूर लोटलं होतं. पण, अखेर इतकं करुनही नियतीनं मात्र काही भलतंच त्याच्यासाठी राखून ठेवलं होतं.