मुंबई : विविध दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कलाकारांची लोकप्रियता हिंदी कलाविश्वातही पाहायला मिळते. त्यातही काही चित्रपटांमुळे दाक्षिणात्य कलाविश्वाला एक वेगळंच महत्त्वं प्राप्त झालं आहे. अशा चित्रपटांपैकीच एक म्हणजे 'बाहुबली'.
एस.एस.राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता प्रभासने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही छाप पाडली की त्याच्या आय़ुष्यातील प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं.
त्याच्या चित्रपटांपासून ते अगदी अनुष्का शेट्टीसोबतच्या त्याच्या नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर जणू चाहते नजर ठेवून आहेत. असा सर्वच चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी असल्य़ाचं कळत आहे.
लग्नसराईच्या या साऱ्या माहोलात प्रभासही आता बोहल्यावर चढण्यासाठी तयार असल्याचं कळत आहे.
सुरुवातीला 'बाहुबली' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्याने आपलं लग्न लांबणीवर टाकलं असल्याचं म्हणत होतं. पण, 'बाहुबली' प्रदर्शित होऊन त्याला यश मिळूनही प्रभासने मात्र काही लग्नाचा विचार केला नव्हता.
आता मात्र त्याच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार 'साहो' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर येत्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये तो लग्नबंधनात अडकणार आहे.
प्रभास नेमका कोणासोबत लग्न करणार यावर प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. आपल्या खासगी आयुष्याविषयी जाहीरपणे फार काही न बोलणारा हा बाहुबली आता आपली अर्धांगिनी म्हणून कोणाला पसंत करतो याकडेच त्याच्या असंख्य चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
येत्या काळात प्रभास 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये उपस्थित राहणार असून, याच मंचावर गप्पांच्या ओघात तो लग्नाची घोषणा करु शकतो असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वर्ष प्रभासच्या आयुष्यात नवी पहाट आणणारं ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.