Bhjojpuri Actor Amrita Pandey: भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी अमृताने व्हॉट्सअॅप स्टेटसवरदेखील अपडेट केलं होतं. अमृताच्या मृत्यूनंतर भोजपुरी सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
अमृता पांड्येने आत्महत्या का केली याचा खुलासा मात्र अद्याप झाला नाहीये. मात्र, अभिनेत्रीने मृत्यूच्या आधी व्हॉट्सअॅप स्टेटच्या माध्यमातून इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. तिने म्हटलं होतं की, दोन बोटींवर स्वार आहे आयुष्य, मी माझी बोट बुडवून त्याचा मार्ग सुकर केला आहे. अमृताच्या या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळं तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरी दाखल होतं तपास सुरू केला. पोलिसांनी ज्या साडीने अभिनेत्रीने गळफास घेतला ती साडी आणि मोबाइल सह अन्य सामान जप्त केले आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमृताचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर समजले की, 3.30 वाजता अमृताची बहिण तिच्या खोलीत गेली होती. तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी लगेचच चाकूच्या सहाय्याने साडी फाडून तिला मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात काही दिवसांपूर्वीच अमृताची बहिणी वीणाचे लग्न झाले होते. शुक्रवारी रात्री सगळं काही व्यवस्थित सुरू होते. मात्र, अचानक काय झाले हे काहीच कळलं नाही. अमृता हिचे लग्न झाले होते. 2022मध्ये छत्तीसगढचे बिलासपुर येथील चंद्रमणि झांगडसोबत तिचे लग्न झाले होते. मुंबईमध्ये ते अॅनिमेशन इंजिनिअर आहे. पण अमृता तिच्या करिअरमुळं सतत चिंतेत असायची. ती डिप्रेशनमध्ये होती. त्यावर तिचे उपचार पण चालु होते.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटांबरोबरच तिने काही वेबसिरीजमध्येही काम केले होते. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अलीकडेच तिची वेबसीरिज प्रतिशोधचा पहिला पार्ट रीलीज झाला होता. त्यासाठी ती खूप उत्साहित होती. पण तिच्या अचानक मृत्यूमुळं एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसंच, अमृताच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचाही अर्थ नेमका काय आहे. याचाही शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येईल.