देशमुख हत्या प्रकरणावरुन विधिमंडळात मुंडेंची कोंडी, महायुतीच्या आमदारांकडूनही सूत्रधार शोधण्याची मागणी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणावरुन रान उठवलंय. या सगळ्या गदारोळात बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे मात्र मौन धारण करुन बसलेत. 

पुजा पवार | Updated: Dec 19, 2024, 09:10 PM IST
देशमुख हत्या प्रकरणावरुन विधिमंडळात मुंडेंची कोंडी, महायुतीच्या आमदारांकडूनही सूत्रधार शोधण्याची मागणी title=
(Photo Credit : Social Media)

(कृष्णात पाटील, ओम देशमुख) नागपूर : बीडच्या संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरुन बीडच्या मंत्र्यांची राजकीय कोंडी झालीये. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणावरुन रान उठवलंय. या सगळ्या गदारोळात बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे मात्र मौन धारण करुन बसलेत. विरोधकांसोबत सत्ताधारीही या प्रकरणातला सूत्रधार शोधावा अशी मागणी करतायेत.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटलेत. संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी थेट सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी नाना पटोलेंनी केली.

संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी कराडवर मोक्का लावला असता असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडेंचे विचार घेऊन काम करण्याचा सल्ला रोहित पवारांनी सरकारला दिलाय. 

हेही वाचा : बस डायरेक्ट पोलीस स्टेशनला घ्या! मद्यधुंदाशी 'ती' एकटीच भिडली, पुण्यातील Video तुफान Viral

 

बीड म्हणजे गँग्ज ऑफ वासेपूर झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. भाजपचे सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी बीडच्या या टोळीचा म्होरक्या शोधून काढा अशी मागणी केलीय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संतोष देशमुखांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येवर चर्चा सुरु असताना बीडचे मंत्री धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित नव्हते. धनंजय मुंडे या हत्या प्रकरणावर सभागृहात का बोलत नाही असा सवाल विचारला जातोय.