#MeTooच्या वादात अडकलेले आलोकनाथ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, अजय म्हणतो....

त्यांच्याविषयी प्रश्न विचारताच... 

Updated: Apr 3, 2019, 10:02 AM IST
#MeTooच्या वादात अडकलेले आलोकनाथ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, अजय म्हणतो....

मुंबई : अभिनेता अजय देवगण याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. रकुल प्रीत आणि तब्बू यांच्यासह अजय या चित्रपटात झळकणार आहे. अशा या चित्रपटात आणखी एक चेहराही झळकला, ज्यामुळे #MeToo च्या विषयाला पुन्हा चालना मिळाली. पण, खुद्द अजयने मात्र या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला. 

बलात्कार, लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूकीचे गंभीर आरोप लावण्यात आलेल्या आलोकनाथ यांना चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहून अनेकांनाच धक्का बसला. यावर आपली प्रतिक्रिया देत अजयने त्याचं मत मांडलं. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी ज्यावेळी निर्माते लव रंजन यांना चित्रपटातील आलोकनाथ यांच्या सहभागाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अजयने त्यात हस्तक्षेप करत या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी हे योग्य ठिकाण नाही', असं सूचक विधान करत तुम्ही ज्यांच्याविषयी विचारत आहात, त्यांच्यावर आरोप लावण्यापूर्वीच चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं, असं अजयने स्पष्ट केलं. अजयने अतिशय सूचक विधान करत या मुद्द्यावर बोलणं टाळलं. 

काही महिन्यांपूर्वी, बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करत विनता नंदा यांनी आलोकनाथवर निशाणा साधला होता. फक्त नंदाच नव्हे तर, कलाविश्वातील इतरही काही अभिनेत्रीनी त्यांच्या वर्तणूकिविषयीचे गौप्यस्फोट केले होते. #MeToo च्या या वादळात आलोकनाथ यांना अनेकांच्याच रोषाचा सामना करावा लागला होता. किंबहुना ही परिस्थिती अद्यापही कायम आहे. अकिव अली दिग्दर्शित ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट १७ मेच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.