घटस्फोटाचं वृत्त देणाऱ्या मासिकावर प्रियांकाची आगपाखड

 त्यांच्या याच नात्याविषयीच्या अनपेक्षित चर्चा समोर आल्या आणि... 

Updated: Apr 3, 2019, 08:43 AM IST
घटस्फोटाचं वृत्त देणाऱ्या मासिकावर प्रियांकाची आगपाखड

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांच्या वैवाहिक  आयुष्याला काही महिन्यांपूर्वीत सुरुवात झाली. प्रियांका आणि निकच्या आयुष्यात आलेलं हे वळण खऱ्या अर्थाने त्यांच्या नात्याला एक वेगळी कलाटणी देणारं ठरलं. लग्नानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केले जाणारे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहता निक आणि प्रियांकाच्या सुखी वैवाहिक आयुष्याचीच प्रचिती येत आहे. पण, काही दिवसांपूर्वी त्यांच्या याच नात्याविषयीच्या अनपेक्षित चर्चा समोर आल्या. 

एका अमेरिकन मासिकात छापलेल्या वृत्तानुसार 'निक्यांका'चं हे नातं फार काळ टिकणारं नसून लग्नानंतर आता ते दोघं घटस्फोट घेणार असल्याचं ते वृत्त होतं. या वृत्तामुळे अनेकांनाच धक्का बसला. प्रियांकाच्या काही निकटवर्तीयांनी हे वृत्त फेटाळत त्यांच्या नात्यात कोणताही तणाव नसल्याचं स्पष्ट केलं. पण, चर्चांना आलेलं उधाण मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. अखेर, प्रियांका आणि निकनेच त्या मासिकाविरोधात पावलं उचलण्याचा निर्णय घेतल्याचं  कळत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त प्रतींची जास्त विक्री होण्यासाठीच ही अशी कृत्य करण्यात येत अलल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लग्न झाल्यापासून प्रियांका आणि निकच्या जोडीविषयी अशा प्रकारच्या नकारात्मक चर्चा या त्यांच्यासाठीही निराशाजनक असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातही 'एप्रिल फूल'च्या दिवसाच्या निमित्ताने जर, त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त छापण्यात आलं असेल तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे असंही प्रियांका- निकचं म्हणण आहे. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

काय लिहिलं होतं मासिकातील त्या वृत्तात? 

निक त्याच्या पत्नीच्या म्हणजेच प्रियांकाच्या वागण्याला कंटाळला आहे. ती त्याच्याशी वारंवार वाद घालत असते, ती अनेकदा वेगळीच वागते त्यामुळेच निकला या साऱ्याचा त्रास होत असल्यामुळे अखेर ते दोघंही घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त त्या मासिकात छापण्यात आलं होतं. 

मासिकात छापण्यात आलेल्या या चुकीच्या वृत्तामुळे संपूर्ण कलाविश्वातून चर्चांना उधाण आलं. हे सर्व वातावरण पाहत अखेर प्रियांकाने त्या मासिकाविरोधात कठोर पावलं उचलत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याता निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. प्रियांका किंवा निककडून मात्र अद्यापही या सर्व प्रकरणावर कोणतीही थेट प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.